लातूर : शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी लघु, मध्यम आणि दीर्घकालीन अशा तीन टप्प्यात उपाययोजना करण्यात येतील. पहिल्या टप्प्यातील उपाययोजनांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार असून सर्वांच्या समन्वयातून शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. लातूर शहरातील वाहतूक कोंडीचे व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, पोलीस उपाधीक्षक श्री. जगदाळे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशितोष बारकुल, यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, ऑटोरिक्षा संघटना, खासगी बस वाहतूक संघटना, मालवाहतूक संघटना, फेरीवाले संघटनेचे पदाधिकारी, अखिल भारतीय ग्राहक संघ, व्यापारी संघाचे प्रतिनिधी यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.

लातूर शहरातील नागरिकांना दैनंदिन भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत नागरिकांच्या, विविध संघटनांच्या सूचना जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात अनेक चांगल्या सूचना, उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांचे लघु, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना अशा तीन टप्प्यात वर्गीकरण करण्यात येईल. यापैकी लघुकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असून जिल्हा प्रशासनामार्फत याबाबत समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासोबतच वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी भुयारी मार्ग, उड्डाणपूल, बाह्यमार्ग आदी उपाययोजनाविषयी आवश्यक प्रस्ताव तयार केले जातील, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. यावर्षी लातूर जिल्ह्यात सुमारे साडेसात कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला आहे. तसेच वेळोवेळी वाहतूक संघटनांची बैठक घेवून त्यांना सूचना देण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री. मुंडे यांनी दिली. राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांची मदत घेवून यापुढेही वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येईल. तसेच नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर टोईंग व्हॅन, जॅमरद्वारे कारवाई करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महानगरपालिकेने शहरातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत वाहतूक नियोजन आराखडा तयार केला आहे. यामध्ये विविध उपाययोजनांचा समावेश असून त्याबाबत अंमलबजावणीचे नियोजन करण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने सुरु करण्यात येणार आहे. तसेच बंद पडलेले सिग्नल सुरु करून त्याठिकाणी उच्च क्षमतेचे कॅमेरे बसविले जातील. जड वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेशासाठी, तसेच फेरीवाले, भाजीपाला विक्रेत्यांसाठी वेळ निश्चित करून देण्यात येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्त श्री. मनोहरे म्हणाले.

चर्चासत्राचे प्रास्ताविक श्री. तोडकर यांनी केले. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकिब उस्मानी यांनी केले. प्रारंभी अजिंक्य युवा मंडळाने पथनाट्य सादर करून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत संदेश दिला. तसेच हेल्मेट, शीटबेल्ट वापराबाबत आवाहन केले. 
संघटना, नागरिकांनी सुचविल्या विविध उपाययोजना
लातूर शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी आयोजित चर्चासत्रात सामान्य नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीमुळे भेडसावणाऱ्या समस्या सांगून त्यावरील उपाययोजनाही सुचविल्या. शहरात पार्किंग झोन निर्माण करणे, सिग्नल व्यवस्था सुरळीत करणे, बस आणि ऑटोरिक्षा यांच्या थांब्याची जागा निश्चित करण्याची मागणी केली.रस्त्यांवरील खडे बुजविणे, काही मार्गांवर एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी, रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्त्यावर होणारे पार्किंग रोखणे, फेरीवाले व हातगाडीवाले यांच्यासाठी धोरण ठरविणे, त्यांना विक्रीची वेळ आणि ठिकाण ठरवून देणे, भाजी मंडाईसाठी जागा ठरवून देणे, सर्व्हिस रोड करणे, जुन्या रेल्वे लाईन मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करणे, व्यापारी संकुल व इतर इमारतींमधील पार्किंगसाठी राखीव जागेतील अतिक्रमण हटविणे आदी विविध सूचनांचाही यामध्ये समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने