जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायतीमध्ये होणार कौशल्य विकास केंद्र माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती

 जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायतीमध्ये होणार कौशल्य विकास केंद्र

माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती
लातूर/प्रतिनिधी ः- ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षणीत करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी गावातच उपलब्ध व्हाव्यात याकरीता भाजप-शिवसेना सरकारने ग्रामस्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील युवक आत्मनिर्भर होऊन गाव तेथे उद्योग या संकल्पनेस आणखीन बळ मिळणार आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र मंजूर झाल्याची माहिती माजी मंत्री  आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
शहराकडे रोजगारासाठी होत असलेले स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे व स्थानिक पातळीवरच रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावीत याकरीता राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार 18 ते 45 वयोगटातील युवक व युवतींसाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम, मिडिया, आयटी, ऑटोमोबाईल्स आदी क्षेत्रासाठी 300 ते 500 तासाचे प्रशिक्षण या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातही ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरु व्हावे अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली होती.
या मागणीसाठी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यातील दहा तालुक्यामध्ये असलेल्या पंधरा ग्रामपंचायतीसाठी कौशल्य विकास केंद्र सुरु होणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. निलंगेकरांनी दिली आहे. यामध्ये निलंगा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, कासारशिरसी, देवणी तालुक्यातील वलांडी, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ, औसा तालुक्यातील किल्लारी व उजनी, अहमदपूर तालुक्यातील किनगाव व शिरुर ताजबंद, चाकूर तालुक्यातील नळेगाव व चापोली, जळकोट तालुक्यातील गुत्ती, लातूर तालुक्यातील मुरुड, रेणापूर तालुक्यातील पानगाव तर उदगीर तालुक्यातील हंडरगुळी व वाढवणा येथील ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यास मंजूर देण्यात आली आहे. लवकरच या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ होऊन त्याचा लाभ युवक व युवतींना प्राप्त होणार आहे. या माध्यमातून प्रधानमंत्री मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत युवक व युवतींना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन व सहकार्य करण्यात येणार आहे. सदर कौशल्य विकास केंद्र मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभा लोढा यांच्यासह माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. या कौशल्य विकास केंद्राचा होतकरू युवक व युवतींनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेस बळ द्यावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने