स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर : स्वातंत्र्याचा अमृतम होत्सव उपक्रम गेली वर्षभर जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभानिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाच्या सांगता समारंभात मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवच्या सांगता समारंभानिमित्त ‘मेरी माटी-मेरा देश, मिट्टी को नमन- विरो का वंदन’ या शीर्षकाखाली लातूर जिल्ह्यातील 786 ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायत पातळीवर करण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतीमध्ये 5X3 फुट या आकारात केंद्र शासनाच्या विहीत मापदंडानुसार आझादी का अमृत महोत्सव प्रितर्थ शिला फलकाची निर्मिती करण्यात येणार आहे. या स्मारक फलकाची निर्मिती शक्यतो अमृत सरोवर, ग्रामपंचायतीचा परिसर अथवा शाळेच्या आवारात करणे अपेक्षित आहे.

स्वातंत्र्य लढ्यात मातृभूमीसाठी वीरमरण पत्करलेल्या सैनिक व स्वातंत्र सैनिकांना अभिवादन करण्यासाठी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने पंचप्राण पतिज्ञा व्यक्तीगत अथवा सामूहिक स्वरुपात गावपातळीवर घेण्यात यावी व त्याची सेल्फी घेवून केंद्र शासनाच्या साईटवर अपलोड करण्यात यावी. या सांगता समारोह कार्यक्रमानिमित्त प्रत्येक गावातील कलशात प्रातिनिधीक स्वरुपात गावातून एक लिटर तांब्याच्या कलशात माती जमा करून पंचायत समितीकडे जमा करावी. पंचायत समिती स्तरावर सर्व कलशातील माती एकत्रीत करुन पंचायत समितीचा कलश दिल्लीला अमृत रोपवाटीका तयार करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वसुधा वंदन उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 75 देशी प्रजातीच्या वृक्षांची विशेष लागवड करण्यात येईल व त्याठिकाणी तसा फलक लावण्यात येईल. 8 ऑगस्ट रोजी गावातील प्रत्येकाच्या शेतामधून जमा केलेल्या मातीच्या कलशासह मशाल फेरीचे आयोजन शाळेतील विद्यार्थी व गावकऱ्यांच्या सहभागाने करावे. 15 ऑगस्ट रोजी लोकांमध्ये जाज्वल्ल देशभक्तीची भावना जागविणेसाठी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगान कार्यक्रम तसेच महाराष्ट्र गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्यसैनिकांच्या व वीर जवानांच्या कुटुंबाचा 15 ऑगस्ट रोजी यथोचित सत्कार व गौरव करण्यासाठी गावपातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
देशासाठी वीरमरण पत्करलेल्या सैनिक व हुतात्मा यांचे स्मरण व त्यांना अभिवादन करण्यासाठी गावातील सर्व महिला, बालक, विद्यार्थी, युवक व नागरिकांनी गावस्तरावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने