राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार

राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार

लातूर: 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे.
राज्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पाच लाख रुपये, अडीच लाख रुपये आणि एक लाख रुपये असे परितोषिक देण्यात येणार आहे. तसेच राज्य समितीकडे 36 जिल्ह्यातील 1 याप्रमाणे 36 शिफारसीत गणेशोत्सव मंडळापैकी 3 विजेते गणेशोत्सव मंडळ वगळून उर्वरित 33 गणेशोत्सव मंडळांचाही राज्य शासनाकडून 25 हजार रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळानी मराठवाडा मुक्तिसंग्राम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, पर्यावरण, वृक्ष लागवड अशा देखाव्यावर भर दिला तर लोकांचे प्रबोधन होईल. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी असे देखावे तयार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. 
या स्पर्धेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश महाडिक यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने