मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव; लातूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव; लातूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन


लातूर- मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात जिल्ह्यातील मोठ्या महाविद्यालयात व्याख्यानमाला आयोजित करून झाली होती. आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते 17 सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, संस्थानीही आपापल्या स्तरावरही अमृत महोत्सवी वर्षाचे कार्यक्रम आयोजित करून मराठवाडा मुक्ती संग्रामात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले, ज्यांनी ज्यांनी या संग्रामात स्वतःला समर्पित करून घेतले त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता,त्यांच्या कार्याला वदंन आणि पुढच्या पिढीला या स्वातंत्र्यासाठी त्या पिढीने केलेला त्याग कळावा, यासाठी हा अमृत महोत्सव साजरा करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

मंत्रालयातून आज मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती सीमा व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन करावयाच्या नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे 17 सप्टेंबर 2022 ते 17 सप्टेंबर 2023 हे वर्षे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरा करत आहोत. लातूर जिल्ह्यात अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाने झाली होती. मुक्तिसंग्रामावरील महत्वाच्या घटना आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या परिचयावर आधारीत प्रदर्शनही आयोजित केले होते, तसेच जिल्ह्यातील काही गावांमध्ये एल.ई.डीद्वारे मुक्ती संग्रामाचा माहितीपटही दाखविण्यात आला होता. आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापर्यंत म्हणजे 17 सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक आठवड्याला एका तालुक्याच्या मुख्यालयी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असून लातूर मुख्यालय सोडून 9 तालुक्यात कार्यक्रम होतील. लातूर येथे 16 आणि 17 सप्टेंबर या दोन दिवसात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तशा सूचना त्या-त्या विभागाला देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाची रूपरेषा पुढच्या आठवड्यात तारखांसह जाहीर केली जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश महाडिक यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने