लातूर जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता’ कार्यक्रमाला सुरुवात

लातूर जिल्ह्यात ‘नव भारत साक्षरता’ कार्यक्रमाला सुरुवात

 लातूर- देशातील शंभर टक्के जनता साक्षर व्हावी, या उद्देशाने केंद्र पुरस्कृत ‘नवभारत साक्षरता कार्यक्रम’ या योजनेची संपूर्ण देशात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देशातील पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींना साक्षर केले जाणार असून या योजनेचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी बुधवारी आढावा घेतला. नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण करुन  10 ऑगस्ट 2023 पर्यंत निरक्षरांची गावनिहाय संख्या निश्चित करावी, असे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी या बैठकीत दिले.

पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन, संख्याज्ञान या पायाभूत विकासासोबतच आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, कायदे विषयक साक्षरता आपत्ती व्यवस्थापन कोशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण इत्यादी महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित केली जाणार आहेत. सर्व जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात ही योजना लागू करण्यात आली आहे. ‘सर्वांसाठी शिक्षण’ हे या योजनेचे वैशिष्ट्य असून शिकाऊ व्यक्तींना 31 मार्च 2027 पर्यंत साक्षर केले जाणार आहे.

लातूर जिल्ह्यातही या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. राज्याकडून जिल्ह्यासाठी दिलेल्या निरक्षर संख्येचे उद्दिष्ट प्रत्येक तालुक्याला ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्याकडून प्रत्येक गावापर्यंत हे उद्दिष्ट पोहोचवण्याचे काम सुरू आहे. शाळेतील शिक्षक त्या गावाचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करणार आहेत. प्रत्येकी 10 निरक्षरांना एक स्वयंसेवक साक्षर करणार आहे. स्वयंसेवकांना यासाठी कोणतेही मानधन दिले जाणार नाही. सर्व निरक्षरांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. निरक्षरांना साक्षर करण्यासाठी स्वयंसेवकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच योजने अंतर्गत सुरू राहणाऱ्या संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर नियामक समिती व कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. हे नियामक समितीचे अध्यक्ष तर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.  यांच्या अध्यक्षतेखाली नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या नियामक समितीची बैठक 19 जुलै रोजी झाली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्य लेखा व वित्त, शिक्षण प्रशिक्षण संस्था, सांख्यिकी, आरोग्य शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, आरोग्य, महिला व बालविकास, समाज कल्याण, महानगरपालिका, शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने