राष्ट्रीय मुख शल्य परिषदेत तोंड उघडण्याच्या लाईव्ह शस्त्रक्रियेत डॉक्टरांना यश


राष्ट्रीय मुख शल्य परिषदेत तोंड उघडण्याच्या लाईव्ह शस्त्रक्रियेत डॉक्टरांना यश

एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील डॉ. गोविंद चांगुले यांची कामगिरी

 

लातूर– सुपारी, गुटखा, तंबाखू या पदार्थांचे दिर्घकाळ सेवन केल्याने तोंड उघडत नसलेल्या एका 42 वर्षीय रुग्णांवर लोणी, अहमदनगर येथील राष्ट्रीय मुख शल्य परिषदेत लातूर येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील मुख शल्य तज्ञ डॉ. गोविंद चांगुले यांनी तोंडाची उघड-झाप करण्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचे देशभरातील 900 मुख शल्य तज्ञांच्या समक्ष लाईव्ह सादरीकरण करुन शस्त्रक्रिया यशस्वी केली.

अहमदनगर येथील एक 42 वर्षीय व्यक्तीने गुटखा, सुपारी व तंबाखू या पदार्थाचे दीर्घकाळ सेवन केल्यामुळे त्याचे तोंड केवळ पाच मिलीमिटर एवढेच उघडत होते. त्यामुळे त्यांना दैनंदिन अन्न्‍, टिखट पदार्थ प्राशन करण्यास त्रास होत होता. तोंड अतीशय कमी प्रमाणात उघडत असल्याने व औषधोपचाराने आजार आटोक्यात येत नसल्यामुळे प्रवरा ग्रामीण दंत महाविद्यालयातील मुख शल्य तज्ञांनी शस्त्रक्रिया करून घेण्यास सांगितले.

दम्यान प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ, लोणी, अहमदनगर येथील ग्रामीण दंत महाविद्यालयातील मुख शल्य विभाग व भारतीय मुख शल्य तज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवशीय राष्ट्रीय मुख शल्य परिषदेत (ता. 19 जुलै) रोजी डॉ. गोविंद चांगुले यांनी देशभरातून आलेल्या 900 मुख शल्य तज्ञ, पद्व्युत्तर विद्यार्थी यांच्या समोर आजारग्रस्त रुग्णाच्या तोंडात शस्त्रक्रिया करुन आतील भागातील कडक झालेले स्नायु शिताफीने मोकळे करुन व त्या ठिकाणी नाकाच्या दोन्ही बाजुंची चमडी (नासोलेबीयल फ्लॅप) काढून त्या ठिकाणी लावून ही लाईव्ह शस्त्रक्रिया यशस्वीपणे पुर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे 45 मिलीमीटर अर्थात तोंडात चार बोटे जातील इतके तोंड उघडण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी मुख शल्य तज्ञ डॉ. सतीश खर्डे यांनी सहाय्य केले तर भूलतज्ञ म्हणून डॉ. विनायक डोंगरे यांनी काम पाहिले.

तसेच या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील मुख शल्य तज्ञ डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. गोविंद चांगुले यांनी परिक्षक म्हणूनही काम पहिले तर डॉ. पुनम नागरगोजे यांनी मुख शल्य या विषयावर शोधनिबंध सादर केला. त्याचबरोबर मुख शल्य पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉ. वर्षा जाजू यांनी शोधनिबंध सादर केला. डॉ. सानिका मेंडकी यांनी पोस्टर सादर केले तर डॉ. ज्ञानेश्वर साखरे, डॉ. शुभम भेले यांनी या परिषदेत सहभाग नोंदवला.

या परिषदेसाठी कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, उप प्राचार्य डॉ. यतिशकुमार जोशी यांनी प्रोत्साहन दिले.

ओरल सबम्युकस फायब्रोसिस वर इलाज शक्य

गुटखा, सुपारी, तंबाखू, पानमसाला, मावा, जर्दा सतत चघळत राहिल्यामुळे तोंडातील स्नायूंची लवचिकता संपुष्ठात येवून ओरल सबम्युकस फाब्रोसिस हा आजार जडतो. त्यामुळे तोंडाची उघड-झाप करण्यास अडचणीचे होते. अन्न प्राशन करण्यास, तिखट खाण्यास त्रास होतो. जळजळ होणे, आग होणे अशा अडचणी उद्भवतात. या आजारावर प्रथमावस्थेत तोंडाचे व्यायाम व औषधोपचार करुन व व्यसन थांबवून आजाराचा प्रादूर्भाव रोखता येतो. वेळीच उपचार न घेतल्यास या आजाराचे कर्करोगात रूपांतर होण्याचा संभाव्या धोका उद्भवू शकतो. मात्र आजाराचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उरतो.

डॉ. गोविंद चांगुले

मुख शल्य तज्ञ

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने