सततच्या पावसात खरीप पिकांची अशी घ्या काळजी !

सततच्या पावसात खरीप पिकांची अशी घ्या काळजी ! 

 कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लातूर : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येवू शकतो. तसेच तणांचा प्रादुर्भाव वाढत असून आंतरमशागतीच्या कामांना बाधा निर्माण होवू शकते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी, याविषयी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले आहे.

शेतात साचलेला पाण्याचा निचरा करावा- वापसा येताच बळीराम नांगराने चार ओळीनंतर सरी पाडून घ्यावी जेणेकरून यापुढील काळात शेतात अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन- चराद्वारे शेतामध्ये साचलेले पाणी शेताबाहेर काढून देणे. मागील काही दिवसांत होत असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यासोबतच जमिनी वापशावर येत नसल्यामुळे पिके जमिनीतील अन्नद्रव्ये घेऊ शकत नाहीत. यामुळेच सोयाबीनचे पीक पिवळे पडले आहे. अशा परिस्थितीमध्ये फवारणीद्वारे 19:19:1950 ग्रॅम + सूक्ष्ममूलद्रव्ये ग्रेड-250 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

तणांचे व्यवस्थापन- जमिनी वापशावर येताच आंतरमशागतीद्वारे कोळपणी करून घ्यावी. आंतरमशागत करणे शक्य नसल्यास पीक एक महिन्याच्या असेपर्यंत तणनाशकाच्या मदतीने तणांचा बंदोबस्त करून घ्यावा. उगवणी पश्चात तणनाशकामध्ये ओडीसी 40 ग्रॅम किंवा परस्युट 400 मिली 200 लिटर पाण्यातून एक एकर क्षेत्रावर फवारणी घ्यावी. तणनाशक फवारणीसाठी स्वतंत्र पंप असावा तसेच स्वच्छ पाणी वापरावे.

कीड आणि रोगाचे व्यवस्थापन- सोयाबीन पीक 25 ते 30 दिवसांचे झाले असेल तर कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम + लॅमडा साह्यलोथ्रीन (अलिका) 03 मिली किंवा कोराजन 03 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 20 मिली यासोबत साफ (मॅन्कोझेब आणि कार्बेडाझीम) हे बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी. तूर पिकामध्ये मर रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन ओळीच्या बाजूने ड्रेचींग किंवा आळवणी घ्यावी.

गोगलगाय प्रादुर्भाव नियंत्रण- शंखी गोगलगाय गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात. गोगलगायच्या नियंत्रणाकरीता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगाय नाशक 2 किलो प्रति एकर या प्रमाणे शेतामध्ये बांधाच्या कडेला आणि बांधावर सांयकाळच्या वेळी पसरुन द्यावे. गोगलगायीचे अंडी आढळून  आल्यास कोळपणी करून नष्ट करावेत.

दुबार पेरणी- ज्याठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे, त्यासाठी सोयाबीन आणि तूर या आंतरपीक पद्धतीचा किंवा सलग तूर पीक किंवा सूर्यफूल या पिकाची निवड करून पेरणी करावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने