दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत नेत्र तपासणी, भ्रमणध्वनी, टीएलएम कीटचे वितरण

 दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत नेत्र तपासणी, भ्रमणध्वनी, टीएलएम कीटचे वितरण
लातूर- हरंगुळ बु. येथील संवेदना प्रकल्प येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत बुद्धीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक टीएलएम (टीचिंग लर्निंग मटेरीअल) किटचे वितरण करण्यात आले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची नेत्र तपासणी आणि दिव्यांगाना सहाय्यभुत साधनांचे वितरण करण्यात आले. सिकंदराबाद येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, संवेदना प्रकल्प, समाज कल्याण विभाग आणि विवेकानंद मेडिकल फौंडेशन व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य व प्रकल्प संपर्क प्रमुख सुरेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, उदय जोगळेकर, संवेदना प्रकल्प कार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, संवेदना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिपा पाटील, राजू गायकवाड, संवेदना प्रकल्प समितीचे कोषाध्यक्ष पांडुरंग चाफेकर यावेळी उपस्थित होते.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या कार्यचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी कौतुक केले. तसेच समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यासाठी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. संवेदना प्रकल्प येथे दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे, यामाध्यमातून दिव्यांगांसाठी इलेक्ट्रॉनिक्स, ड्रेस मेकेइंग व कॉम्प्यूटर ऑपरेटर या विषयासंबंधी लागणारी यंत्र सामग्री व सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने दिव्यांगाना रोजगार मिळेल. ते स्वाभिमानाने जगू शकतील. शासनाच्या माध्यमातून याठिकाणी कॅम्पस मुलाखती घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये संवेदना प्रकल्पाच्या विविध उपक्रमाची माहिती देवून युडीआयडी कार्ड, भ्रमणध्वनी वितरण आणि तपासणी शिबिराचा उद्देश सांगितले.

नदीहत्तरगा येथील जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील दिव्यांग मुलांनी तयार केलेले राखी, पुष्पहार व पेपर कप इत्यादी साहित्याची पाहणी उपस्थितांनी केली. राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थेच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. वसिम अहमद यांनी विशेष शैक्षणिक साहित्याबद्दल माहिती दिली व पालकांनी या साहित्याचा कसा वापर करावा, याविषयी मार्गदर्शन केले. सुरेश बेडके यांनी पालकांशी समन्वय साधला. लातूर येथील विवेकानंद मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटरच्यावतीने संवेदना विद्यालयातील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.

गरजू दिव्यांग बांधवांना साहित्य व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनी वितरण, व्हीलचेअर, सहाय्यभूत साधनांचे वितरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. एका दृष्टीबाधित महाविद्यालयीन विद्यार्थ्याला भ्रमणध्वनी, दोन चाकाची खुर्ची, 133 दिव्यांग विद्यार्थ्यांना टीएलएम कीट वितरण करण्यात आले. 66 दिव्यांग विद्यार्थ्यांची व 24 पालकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र समिती सदस्य पारस कोचेटा, वैजनाथ व्हनाळे, सत्याप्रेम मुस्ने, विशेष शिक्षिका जयश्री माने, प्रणिता क्षीरसागर, शीतल पाटोळे, भौतिक उपचार तज्ज्ञ डॉ. मयुरी बिल्लावर, योग शिक्षक चेन्नया स्वामी, संगणक विभागातील अनुप दबडगाववकर, मानोसपचार तज्ज्ञ नवाज शेख, विशेष शिक्षक शिवाजी चौरे, सचिन राऊत, बाळासाहेब गंगणे, बस्वराज पैके यांच्यासह संवेदना शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी दिव्यांग विद्यार्थी यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डीडीआरसीचे सुरज बाजुळगे यांनी केले. सत्यप्रेम मुसने यांनी आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने