‘हर घर तिरंगा’ अभियानात उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे

‘हर घर तिरंगा’ अभियानात उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे

* १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत अभियानाचे आयोजन 
 
लातूर  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अर्थात 'घरोघरी तिरंगा' हा उपक्रम गतवर्षी मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला. यावर्षीही १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'घरोघरी तिरंगा' उपक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व शासकीय- निमशासकीय कार्यालयांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
 
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमाची अंमलबजावणी गतवर्षी अतिशय यशस्वीरित्या करण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान 'अमृत सप्ताह' राबविण्यात येत आहे. क्रांती दिनापासून सुरू झालेल्या या सप्ताहात 'मेरी माटी मेरा देश' अर्थात ' माझी माती, माझा देश' अभियान, १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा' अभियान राबिण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना तिरंगा झेंडा उपलब्ध होण्यासाठी ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हास्तरावर राष्ट्रध्वज विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, विविध सेवाभावी संस्था, शिक्षण संस्थांसह नागरिकांनी 'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी आपले फोटो, सेल्फी https://harghartiranga.com/ या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर- घुगे यांनी केले आहे.
 
*भारतीय ध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज यथोचितरित्या सन्मानाने फडकवावा*
 
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा' हे अभियान उत्साहात राबविण्यासमवेत राष्ट्रध्वज यथोचितरित्या सन्मानाने फडकविण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. राष्ट्रध्वज फडकवितांना राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात यावी, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने