औषधी विक्रेत्यांनी कायद्याचे पालन करून व्यवसाय करावा : सहा. आयुक्त आर. व्ही. पोंगळे

 औषधी विक्रेत्यांनी कायद्याचे पालन करून व्यवसाय करावा : सहा. आयुक्त  आर. व्ही. पोंगळे 


लातूर : औषधी विक्रेत्यांनी कायद्याचे काटेकोरपणे पालन करून आपला औषधी विक्रीचा व्यवसाय करावा व प्रशासनास सर्वतोपरी सहयोग द्यावा असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त  आर. व्ही. पोंगळे यांनी केले. 
           जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे मॅडम   निर्देशानुसार लातूर तालुका केमिस्ट संघटना, अन्न आणि औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त  आर. व्ही. पोंगळे, व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे  पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले  यांच्या सोबत शहरातील शिकवणी परिसरातील औषधी विक्रेत्यांची  संयुक्त बैठक घेऊन  एनडीपीएस शेड्युल   औषधांची विक्री, अंमली पदार्थ सेवन  प्रतिबंध या संदर्भात सखोल मार्गर्शन आणि जनजागृती बाबतीत व्यापक चर्चासत्र घेतले. या बैठकीचे आयोजन लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.च्या वतीने करण्यात आले होते.  यावेळी लातूर जिल्हा केमिस्टस अँड ड्रगिस्ट असो.चे अध्यक्ष रामदास भोसले, सचिव अरुण सोमाणी , लातूर  तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे अध्यक्ष ईश्वर बाहेती, सचिव नागेश स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त पोंगळे पुढे म्हणाले की,  औषध विक्री हा व्यवसाय समाजसेवेचा, सामाजिक कार्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे. औषधी विक्रेत्यांसाठी  कायद्याने जी नियमावली दिली आहे, तिचे पालन करणे हे प्रत्येक औषधी व्यावसायिकांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. 
                  पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी यावेळी बोलताना औषधी विक्रेत्यांनी एनडीपीएस शेड्युल मधील नशेची, गर्भपाताची औषधे विक्री करताना तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय अशा प्रकारची औषधे कोणालाही विक्री करू नये.  अन्यथा असे प्रकार करणाऱ्या संबंधित  केमिस्टवर गुन्हे दाखल केले जातील याची नोंद घ्यावी असे सांगितले. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय एनडीपीएस शेड्युल मधील औषधांची विक्री करणे गुन्हा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  अशा प्रकारची औषधे विना प्रिस्क्रिप्शन मागणाऱ्या ग्राहकांना औषधासाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या चिट्ठीची मागणी करावी असेही त्यांनी सांगितले. लातूर जिल्हा केमिस्टस अँड ड्रगिस्ट असो.चे अध्यक्ष रामदास भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण सर्वजण अत्यंत संवेदनशील व्यवसाय करत असून आपल्या व्यवसायाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊनच केमिस्ट बांधवांनी  व्यवसाय करावा असे आवाहन केले.  डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय एनडीपीएस शेड्युल मधील औषधांची करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विक्रेत्याच्या पाठीशी संघटना कधीही उभी राहणार नाही, असा इशाराही भोसले यांनी दिला. 
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर बाहेती यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी बैठकीच्या आयोजनामागची पार्श्वभूमी सविस्तरपणे विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश स्वामी यांनी केले.  यावेळी राजकुमार राजारूपे , अरविंद औरादे, रवींद्र दरक, अंकुश भोसले, प्रकाश रेड्डी, मनोज आगाशे, उमाकांत पाटील, अनिल जवादवार, सुनील स्वामी यांसह केमिस्ट्स बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने