आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला अखेर यश क्रांतीवीर दत्तोबा भोसले स्मारकासाठी एक कोटीचा निधी

 आ.सतीश चव्हाण यांच्या मागणीला अखेर यश क्रांतीवीर दत्तोबा भोसले स्मारकासाठी एक कोटीचा निधी
 लातूर - जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मातोळा (ता.औसा) येथे क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे स्मारक उभारण्यासाठी रू.एक कोटीचा निधी देण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आ.सतीश चव्हाण यांनी दिली. आ.सतीश चव्हाण यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची भेट घेऊन सदरील स्मारक उभारण्यासाठी एक कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. 

 निजाम राजवटीतून मराठवाडा मुक्त व्हावा यासाठी अनेक स्वांतत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. त्यातील एक नाव म्हणजे क्रांतीवीर दत्तोबा भोसले. दत्तोबा भोसले यांचा जन्म मातोळा येथे झाला. मराठवाडा मुक्तीसाठी दत्तोबा भोसले यांनी सोलापूर, धाराशिव, लातूर परिसरात रझाकाराच्या विरोधात मोठा लढा उभा केला. त्यांच्या शौर्याच्या अनेक कथा लातूर व धाराशिव जिल्ह्यात आजही चर्चेल्या जात असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगितले. मराठवाडा मुक्तीसंग्रामात उल्लेखनीय योगदान देणार्‍या क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांच्या मातोळा या मुळ गावी त्यांचे स्मारक झाले तर भावी पिढीसाठी ते नक्कीच प्रेरणा देणारे ठरेल यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली होती. 

 अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून छत्रपती संभाजीनगर नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मातोळा (ता.औसा) येथे क्रांतीवीर दत्तोबा भोसले यांचे स्मारक उभारण्यासाठी रू.एक कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरील निर्णय घेतल्याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, ना.देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने