गणेशोत्सव काळात सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

गणेशोत्सव काळात सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे - क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
लातूर : गणेशोत्सव काळात गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या तातडीने मिळण्यासाठी, तसेच या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

उदगीर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित विविध शासकीय विभागांच्या बैठकीत ना. बनसोडे बोलत होते. 

माजी आमदार गोविंदराव केंद्रे, तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपविभागीय कृषि अधिकारी एन. आर. काळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता सायस दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. डी. देवकर, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, शहर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उदगीर शहर आणि तालुक्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच उदगीर नगरपालिकेने शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवावेत. गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या देण्यासाठी महसूल पोलीस प्रशासन, नगरपरिषद, महावितरण यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

 नगरपरिषदेने शहरातील स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात. भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्यासाठी सर्वेक्षण आणि इतर कामांना गती द्यावी. या प्रस्तावासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याल प्राधान्य द्यावे, असे ना. बनसोडे यांनी यावेळी सांगितले. तसेच नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.

उदगीर तालुका क्रीडा संकुलामध्ये उपलब्ध होणार अद्ययावत क्रीडा सुविधा

उदगीर तालुका क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना मुंबई, पुण्याच्या धर्तीवर क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रस्तावाचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू घडण्यासाठी त्यांना अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने