शिक्षकांनी या रजा आंदोलनात सहभागी व्हावे- अरुण सोळुंके

 शिक्षकांनी या रजा आंदोलनात सहभागी व्हावे- अरुण सोळुंके 
               लातूर/प्रतिनिधी -जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती लातूर ५ सप्टेंबर शिक्षक दिन, शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. सन्मा. प्रशासकीय अधिकारी आणि सन्मा. लोकप्रतिनिधी या दिवशी शिक्षकांबद्दल खूप चांगले बोलतात. शिक्षकांना राष्ट्रनिर्माता,  मुल्यसंवर्धक अशा प्रकारे  शब्दालंकार लावुन गौरवोद्गार काढतात.  त्या बद्दल आम्ही शिक्षक सर्वांप्रती शिक्षक समिती आभार व्यक्त करते. 
परंतु मागील काही वर्षांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, तेथील विद्यार्थी, दिले जाणारे शिक्षण आणि शिक्षकांबाबत असणारे धोरण अनाकलनीय आहे. आमच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निरसनाबाबत सर्वच स्तरावर असणारे औदासिन्य लक्षात घेता ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षकांचा उदोउदो आणि उर्वरित वर्षभर निंदानालस्ती, जाणीव पुर्वक केले जाणारे दुर्लक्ष यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थातील प्राथमिक शिक्षक आत्यंतिक व्यथित आहोत.
शाळातील शिक्षकांची रिक्त पदे, जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना online कामे आणि मागे लावलेल्या विविध Apps च्या ससेमिर्यामुळे, BLO सारख्या वर्षभर चालणाऱ्या अशैक्षणिक कामात शिक्षकांचा गळा दाबून टाकला आहे. अध्यापनावर विपरीत परिणाम होतो आहे, वीजबिल भरायला शाळांकडे पैसे नाहीत इतकी दारुण अवस्था आहे, शाळांमध्ये अनेक मूलभूत सुविधांची वाणवा असताना गुणवत्ता संवर्धनाच्या नावाखाली अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या व उपद्रवी उपक्रमांच्या हैदोसामुळ आम्ही त्रस्त झालो आहे, आमचे मानसिक स्वास्थ्य हरवले आहे. या सल्ला देणार्‍या आणि उपक्रम सुचविणाऱ्या स्वयंसेवी संस्था शैक्षणिक गुणवत्ता किंवा अन्य कोणत्याही बाबींना बांधील किंवा उत्तरदायी नसतात हे विशेष..! 
          शिक्षकांच्या न्यायोचित मागण्या शासन म्हणुन पुढाकार घेऊन सोडवल्या पाहिजेत किमान त्या समजून तरी घेतल्या पाहिजेत असा कोणताही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळत नाही. हे फारच दुर्दैवी आहे.
काही घटकांकडून फक्त जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयाच्या नावाखाली घरभाडे भत्ता बंद करण्यासह कठोर कारवाई करण्यासाठीचा दुराग्रह व ८० टक्के शिक्षक भ्रष्टाचारी असल्याचा त्यांचा साक्षात्कार... आणि या संबंधाने इतरांचे मौन..!  या सर्व बाबी आमच्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहेत. 
शाळा, विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी "महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती "म्हणुन आम्ही सातत्याने शासनाकडे आर्जवे करीत निवेदन देत आहोत. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने सनदशीर सत्याग्रह केले आहेत. तरीही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने गोरगरीब बहुजन वंचित घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी आणि शिक्षकांच्या आत्मसन्मानासाठी वेगळी भूमिका घेण्याशिवाय आम्हाला तरणोपाय दिसत नाही.
म्हणून आमचा तोंडदेखला गौरव न करता खऱ्या अर्थाने आम्हाला समजून घेऊन न्याय मिळावा यासाठी आम्ही "महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती " म्हणून शिक्षक दिनी ५ सप्टेंबर २०२३ रोजी एक दिवसाच्या सामुहिक किरकोऴ रजेवर जाण्याचा निर्णय राज्यशाखेने घेतला आहे. 
ज्या राज्यात शिक्षकांचा सन्मान होत नाही. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात नाहीत.  आम्हाला शिकवु द्या, असे म्हणत शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागते, हे सगळे अत्यंत अस्वस्थ वर्तमान आहे. म्हणूनच एका दिवसाचा सन्मान आणि तोंडदेखले कौतुक आम्ही नम्रपणाने नाकारत आहोत. आम्ही शिक्षक दिनाच्या कोणत्याही कार्यक्रमावर बहिष्कार टाकत नसून,  पुरस्कारार्थी शिक्षक बांधवांच्या आनंदाला गालबोटही लावत नाही,  कुणाचा अपमानही करीत नाही.
मात्र शासनाने आमच्या मागण्या व व्यथा समजून घेऊन आम्हाला शिकवु द्या यासाठी न्याय देण्याची भूमिका घेण्यासाठी आमचे हे  एक दिवसीय सामुहिक किरकोळ रजा आंदोलन आहे. शासनाने गांभीर्याने चर्चा करून सकारात्मक व दृश्य निर्णय तातडीने घेतल्यास आंदोलन करण्यात कोणतेही स्वारस्य नाही.
तथापि आमच्याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा पुढचा टप्पा घेण्याशिवाय पर्यायही नाही.
सर्व शिक्षक बांधवांना विनंतीवजा आवाहन करण्यात येते की - आपल्या न्यायसंगत मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यासोबतच काही घटकांकडून वारंवार अपमानित केल्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबर २०२३ च्या सामुहिक रजा आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या व्यथा समाजासमोर आणाव्यात.सदरील निवेदन दिनांक 5 सप्टेबर रोजी उपसंचालक गणपत मोरे यांच्याकडे शिक्षक समितीचे कार्यकर्ते देणार आहेत तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी समुहीक रजा आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक समितीचे राज्यसंपर्कप्रमुख किसनराव बिरादार, जिल्हाअध्यक्ष अरुण सोळुंके, सरचिटणीस चंद्रकांत भोजने, रणजीत चौधरी, विकास पुरी, नजीर मुजावर विजय कोरे गोपाळ गुट्टे मनोज मुंडे अभय बिरादार संजय कदम तुकाराम पाटील राम शेवाळे भरत पुंड, कमलाकर काकडे केदारनाथ बिडवे कुलदीप पाटील प्रकाश मोरतळे प्रवीण काळे,. लक्ष्मण टिळे यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने