छत्रपती संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार : क्रीडा मंत्री संजय बनसोडे

 छत्रपती संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार  : क्रीडा मंत्री संजय बनसोडे


 

छत्रपती संभाजीनगर  :-  आपल्या राज्यातील खेळाडुंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे नाव उंचवावे, यासाठी खेळाडुंना सर्व प्रकारच्या उत्तम सुविधा देण्यास शासन कटीबध्द आहे. तसेच  विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, याकरीता छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जाईल, त्याला आवश्यक निधी मंजूर केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री  संजय बनसोडे यांनी दिली.

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय व महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे आज सकाळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दौडचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

कार्यक्रमास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाट,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, क्रीडा व युवक सेवा  विभागाचे उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, जालन्याचे क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, परभणीचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे आदींसह विद्यार्थी, खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

 

            मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन श्री. बनसोडे म्हणाले की, निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे मराठवाडा मुक्तीसाठी उल्लेखनीय योगदान होते. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. क्रीडा मंत्री म्हणून राज्यात क्रीडा विषयक प्रगतीसाठी  मी  कटीबध्द आहे. खेळाडुंना चांगल्या क्रीडांगणासह उत्तम अत्याधुनिक सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. राज्यात लवकरच ऑलिम्पिक भवन, स्पोर्टस सायन्स सेंटर स्थापन्याचा मानस आहे. याबरोबरच जिल्हा, तालुका पातळीवरही खेळाडुंना चांगल्या सुविधा पुरवल्या जातील. शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या रकमेत तीन लाखांवरुन रुपये पाच लाख अशी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्राची शान असणारे स्वर्गीय  कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

केंद्रीय राज्यमंत्री  डॉ. कराड म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रयत्नांमुळे तब्बल एक वर्ष, एक महिना व दोन दिवसांनी मराठवाडयाला निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले आहे. या स्वातंत्र्याच्या आंदोलनात अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला. त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. आपल्या मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.  

 

 

पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले, जिल्हयातील क्रीडा विकासासाठी शासनाने अनेक कामे मंजूर केली आहेत. या कामांसाठी निधी कमी पडणार नाही, याची  दक्षता घेतली जाईल. दरम्यान,  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त शहरात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिक  लढले. त्यांच्या लढयामुळेच मराठवाडा मुक्त झाला आहे. मराठवाडयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन आपल्या पाठीशी आहे. तर दौडमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी भविष्यात आपल्या राज्याचा व देशाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

            प्रास्ताविक क्रीडा विभागाचे उपसंचालक संजय सबनीस यांनी केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते  मराठवाडा मुक्तिसंग्राम दौडला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या दौडमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, खेळाडू, क्रीडाप्रेमी  उत्स्फुर्तपणे  सहभागी झाले होते. ढोलताशा, लेझीमच्या गजरात सर्वांचा उत्साह यावेळी  व्दिगुणित करण्यात येत होता. महाराष्ट्रीयन वेशभुषा परिधान करुन विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. तर देशभक्तीपर गीतांनी वातावरण अधिकच उत्साहवर्धक झाले होते. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने क्रीडा संकुलातून निघालेली दौड सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल मार्गे क्रांती चौक येथे पोहोचली. या ठिकाणी दौडचा समारोप झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने