कुष्ठरोग शून्यावर आणणे हेच अंतिम ध्येय- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घूगे
लातूर : आज कुष्ठरुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असली, तरीही अद्यापही बऱ्याच रुग्णांचे निदान होत आहे. त्यात लहान मुलांना कुष्ठरोग होत आहे, ही सामाजिकदृष्ट्या गंभीर बाब आहे. त्यामुळे कुष्ठरोग शून्यावर आणणे हेच अंतिम ध्येय असावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. कुष्ठरोग संदर्भातील माहिती व नियोजन पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रशिक्षणार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग ) डॉ. विद्या गुरुडे, जिल्हा केंद्रीय पथकाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कदम, अवैद्यकीय पर्यवेक्षक एम. एस. लोहार, एल. व्ही. शिंदे, एस. एस. फले, सांख्यिकी सहाय्यक एस.एस. धुमाळ व अवैद्यकीय सहाय्यक श्री आर. पी. केंद्रे हे यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री प्रगती योजनेतंर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने २०२७ पर्यंत 'शून्य' कुष्ठरोग संसर्ग ही कल्पना जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यासाठी जिल्ह्याचे २०२५ व तालुक्याचे २०२६ पर्यंत कुष्ठरोग दूरीकरणाचे ध्येय साध्य करावयाचे आहे. तसेच गाव पातळीवर २०२७ मध्ये 'शून्य' कुष्ठरोग संसर्ग संकल्पना राबविण्यात येणार आहे. सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील ३१९ गावे, सन २०२५-२६ मध्ये २५२ व सन २०२६-२७ मध्ये ५१७ गावामध्ये 'शून्य' कुष्ठरोग संसर्ग हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या १७५ कुष्ठरुग्ण औषधोपचार घेत आहेत 'शून्य' कुष्ठरोग संसर्ग सन २०२७ पर्यंत साध्य करण्यासाठी लवकरात लवकर निदान व उपचार रुग्णांच्या निकट सहवासितांना 'रीफॅपीसिन' या औषधाची एकमात्रा देवून त्यांना कुष्ठरोगापासून ६० टक्केपर्यंत संरक्षण प्रदान करणे. तसेच जुन्या रुग्णांना विकृती प्रतिबंधात्मक व वैद्यकीय पुर्नवसन सेवा देवून उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.
जुन्या रुग्णांना लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे दररोज, उदगीर सामान्य रुग्णालय व निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे दर गुरुवारी व अहमदपूर ग्रामीण रुग्णालय येथे दर सोमवार आणि औसा ग्रामीण रुग्णालय येथे दर बुधवारी कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र चालविण्यात येत आहे. त्यामध्ये रुग्णांना विविध सुविधा व सेवा पुरविण्यात येतात. लातूर जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पथदर्शक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हे आहेत. या समितीमार्फत कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येत आहे. या पथदर्शक कार्यक्रमासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे.
टिप्पणी पोस्ट करा