लातूर–टेंभूर्णी रस्त्याचे प्रत्यक्ष काम तीन महिन्यात सुरू होणार
केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आ. रमेशआप्पा कराड यांना दिला विश्वास
लातूर – लातूर–मुरुड–बार्शी–टेंभुर्णी या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून येत्या तीन महिन्याच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा विश्वास केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांना दिला.
केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे सोमवारी त्यांच्या निवासस्थानी आ. रमेशअप्पा कराड यांनी भेट घेवून लातूर ग्रामीण मतदार संघातील आणि जिल्ह्यातील विविध रस्त्याच्या कामाबाबत सविस्तर चर्चा करुन मागण्यांचे निवेदन सादर दिले. यावेळी उद्योजक जगदीश कुलकर्णी हे होते.
लातूर–मुरुड–ढोकी–येडशी–बार्शी–टेंभुर्णी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाच्या संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत घोषणा करण्यात आली असून या रस्त्याचे डांबरीकरणाने चौपदरीकरण करण्याच्या कामाला मंजूरी देवून निधी उपलब्ध करुन द्यावा. त्याचबरोबर लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध रस्ते अत्यंत खराब झाले असून खराब झालेल्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी त्याचबरोबर काही रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी केंद्रीय मार्ग (सीआरएफ) योजने अंतर्गत विविध कामांना मंजूरी देवून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे आ. रमेशअप्पा कराड यांनी केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्याकडे केली असता लातूर - टेंभुर्णी या रस्त्यावर जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेता येत्या तीन महिन्याच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे सांगून केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना केल्या.
टिप्पणी पोस्ट करा