मुरुड आणि पानगाव रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या जलद रेल्वेंना लवकरच थांबा

मुरुड आणि पानगाव रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या जलद रेल्वेंना लवकरच थांबा
 रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड यांना ग्वाही

 

          लातूर - लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रात असलेल्या मुरुड आणि पानगाव या दोन्ही रेल्वे स्थानकातून जलद गतीने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांना दिली.

          भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी भेट घेऊन रेल्वे प्रवासाच्या अडचणी बरोबरच विविध विषयावर चर्चा केली यावेळी उद्योजक जगदीश कुलकर्णी हे होते.

         औद्योगिक दृष्ट्या विकसित होत असलेल्या लातूर तालुक्यातील मुरुड येथील रेल्वे स्थानकावर कोरोना काळापासून काही रेल्वेचा थांबा बंद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून थांबा बंद करण्यात आलेल्या आणि जलद गतीने धावणाऱ्या रेल्वेंना मुरुड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा. त्याचबरोबर रेल्वे स्थानकावर ऑपरेटिंग स्टेशन कार्यान्वित करून भौतिक सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी नागपूर नंतर केवळ पानगाव येथेच आहेत. या अस्थिच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून अनुयायी मोठ्या संख्येने पानगाव येथे येत असल्याने पानगाव येथील रेल्वे स्थानकावरून जलद गतीने धावणाऱ्या रेल्वेंना थांबा देऊन होणारी जनतेची गैरसोय दूर करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे आ. रमेशअप्पा कराड यांनी केली असता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मुरुड आणि पानगाव या दोन्ही रेल्वे स्थानकावर जलद गतीने धावणाऱ्या रेल्वेंना लवकरात लवकर थांबा मिळावा याकरिता उचित कार्यवाही करण्यात येईल असे सांगून रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना केल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने