आपलं ज्ञानरुपी नाणं खणखणीत असावं-डॉ. गणपतराव मोरे


 आपलं ज्ञानरुपी नाणं खणखणीत असावं-
डॉ. गणपतराव मोरे
 लातूर- ज्ञान हे शिक्षकांचे भांडवल असते. ते वाचनातून मिळते. वाचन हा आपल्या जीवनाचा भाग व्हावा. आपलं ज्ञानरुपी नाणं खणखणीत असल्यास सुसंस्कृत समाज निर्मिती होते, असे प्रतिपादन लातूरचे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी केले.
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत येथील राजमाता जिजामाता अध्यापक महाविद्यालयातील एम. ए. शिक्षणशास्त्र (एम. ए. एज्युकेशन) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे उद्बोधन व संपर्क सत्राचे गुरुवारी डॉ. मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे होते. यावेळी प्रा. प्रदीप करंजीकर, केंद्र प्रमुख प्राचार्य जी. आर. मुंडे, केंद्र संयोजक प्रा. स्वाती केंद्रे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी डॉ. मोरे म्हणाले, मी प्राथमिक शाळेत शिक्षक असताना पीएच.डी. करीत होतो. प्राथमिकच्या शिक्षकाला पीएच.डी. करण्याची काय गरज आहे, असे अनेकजण म्हणाले. पण मी अत्युच्च ज्ञान आत्मसात करण्याचे ध्येय ठेवत पीएच.डी. पूर्ण केली. यानंतर वाचनात सातत्य ठेवत परीक्षांना सामोरे जात आज इथपर्यंत पोहोचलो आहे. कोण काय म्हणतंय याकडे लक्ष न देता पुढे चालावे. चांगल्या विचारांचा प्रचार झाल्यास समाजाचे भले होते, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य केंद्रे म्हणाले, राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्कृती पवार हिने मागच्या वर्षी ‘नीट’ परीक्षेत ७२० पैकी ६९० गुण घेतले आहेत. या संकुलाचा दरवर्षी शंभर टक्के निकाल लागतो. एम. ए. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे मुख्याध्यापक व शिक्षक हे अनुभवी आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना २४ वर्षांची वेतनश्रेणी मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात प्रा. स्वाती केंद्रे यांनी, एम. ए. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम व निकाल याबद्दल माहिती नमूद केली. सूत्रसंचालन सी. एस. मोटे यांनी केले तर आभार प्रा. व्ही. डी. लोहारे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने