अण्णासाहेब पाटील महामंडळामुळे दिनेशचा शेती, कॉलेज ते मेडीकल व्यवसाय

 अण्णासाहेब पाटील महामंडळामुळे दिनेशचा शेती, कॉलेज ते मेडीकल व्यवसाय

धाराशिव :  कोणतेही काम करण्याची इच्छाशक्ती असली आणि त्याला परिश्रम करण्याची जोड मिळाली की कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते. हे धाराशिव तालुक्यातील येडशी येथील रहिवासी असलेल्या दिनेश पाटीलने सिध्द करुन दाखविले आहे. घरच्या शेतीत वडीलांना मदत करुन शिक्षण घेतांना पुढे त्या शिक्षणातूनच व्यवसाय थाटून युवा वर्गापुढे आदर्श निर्माण केला आहे. मेडीकल स्टोअर्स सुरु करुन स्वत: स्वावलंबी होवून तीन जणांना रोजगारदेखील दिनेशने उपलब्ध करुन दिला आहे.

दिनेशने सन २००८ ते 20१२ या कालावधीत शिक्षण घेत असतांना घरच्या शेतीच्या कामांमध्ये वडिलांना मदत केली. शेती करत असतांना दिनेशच्या असे लक्षात आले की, शेतीला पुरक व्यवसायाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण शिक्षण घेतलेल्या फार्मसी अभ्यासक्रमाचा उपयोग केला पाहिजे. हे लक्षात घेऊन दिनेशने सन 2013 मध्ये धाराशिव येथील आनंदनगर पोलीस स्टेशनसमोर मेडिकल व्यवसाय सुरू केला. कुठलाही व्यवसाय म्हटले की, अडचणी हया आल्याच. त्या अडचणींना सामोरे जाऊन दिनेशने काही काळ व्यवसाय सुरळीत व चांगला सुरु ठेवला. या कालावधीमध्ये व्यवसायात वाढ होत गेली. सन २०१८ ते 2023 या पाच वर्षांमध्ये व्यवसायाचा आलेख वाढतच गेला.

वाढत्या व्यवसायाला आवश्यकता होती ती अत्याधुनिक होण्याची. त्यासाठी लागणाऱ्या गुंतवणूकीसाठी पैसा उभारायचा कोठून याबाबत एके दिवशी दिनेशने वडीलांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान व्यवसाय उभारण्यासाठी लागणारी रक्कम आणायची तर कोठून हा प्रश्न निर्माण झाला. दिनेशला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबद्दल माहिती मिळाली. दिनेशने निश्चय केला, की या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यावर जो काही कर्जाचा व्याज परतावा आहे, त्याचे व्याज महामंडळाकडून आपल्याला आपला बँकेचा हप्ता भरल्यानंतर परत मिळतो.

त्यासाठी दिनेशने थेट धाराशिव येथील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कार्यालय गाठून महामंडळाच्या कर्जाविषयीची माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वयक प्रशांत घुले यांना भेटून घेतली. श्री. घुले यांनी दिनेशला महामंडळाच्या कर्जाविषयी सविस्तर माहिती दिली. या महामंडळाचे कर्ज घेण्याचा निर्णय दिनेशने घेतला. त्यासाठी त्याने पुढील बँकेची कर्ज मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीला महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र काढून घेतले. पंजाब नॅशनल बँकेत जाऊन कर्ज उपलब्धतेबाबत माहिती घेतली. बँकेकडून दिनेशला कर्ज उपलब्धतेबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पूर्वी बँकेबद्दल सगळीकडे नकारात्मक चर्चा ऐकून होता. पण तसे काहीच नसल्याचे दिनेशला बँकेच्या व्यवस्थापकाशी चर्चा केल्यानंतर लक्षात आले. उलट बँकेच्या व्यवस्थापकाने दिनेशला कर्ज उपलब्ध करुन देण्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहित केले.

बँकेच्या व्यवस्थापकांनी दिनेशला महामंडळांतर्गत 9 लक्ष 75 हजार रुपयांचे 2018 ला कर्ज मंजूर केले. महामंडळाच्या धाराशिवमधील सुरुवातीचा काळातील लाभार्थ्यांपैकी दिनेशही एक लाभार्थी होता. मिळालेल्या कर्जामधून दिनेशला मेडिकल स्टोअर्स अत्याधुनिक पद्धतीचे करायचे होते. बदलत्या काळानुसार त्यासाठी दिनेशने घेतलेल्या कर्जातून फर्निचर, कॉम्प्युटर, फ्रीज, प्रिंटर व उपलब्ध होणाऱ्या विविध औषधी या गोष्टी खरेदी केल्या. त्यानंतरच्या काही काळातच व्यवसाय वाढतांना दिसला. सध्या दिनेशकडे तीन कामगार काम करतात. तीन कामगारांना 15 हजार रुपये देऊन महिन्याकाठी दिनेशला 35 हजार रुपये शिल्लक राहतात. या महामंडळाची एक चांगली गोष्ट अशी की, आपण बँकेला वेळेवर हप्ता भरायचा. भरलेला हप्ता महामंडळाकडे क्लेम करायचा. महामंडळ आपला क्लेम पाहून व चालू व्यवसायाचा फोटो पाहून आपल्याला त्या महिन्याचा व्याज परतावा करते.

दिनेशला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेबद्दल कळल्यापासून त्याचे मित्रमंडळी व नातेवाईकांमध्ये योजनेबद्दल दिनेशने माहिती दिली. त्यातील आज अनेक जण या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय करीत आहे. मराठा समाजातील तरुणांनी व्यवसायाकडे वळायला हवे. व्यवसायासाठी लागणारे जे काही भांडवल आहे, ते बँकेकडून उपलब्ध झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याचा लाभ घेता येतो. त्यासाठी सर्वांनी आपल्या व्यवसायाचे आयटीआर सीबील व्यवस्थित ठेवणे आवश्यक असल्याचे दिनेशने सांगीतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने