सामाजिक संवेदना जागृत करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : डॉ. संदीपान जगदाळे

दयानंद कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

सामाजिक संवेदना जागृत करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना : डॉ. संदीपान जगदाळे
लातूर : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच त्यांच्यामध्ये सामाजिक व राष्ट्रीय संवेदना जागृत करून आदर्श समाज आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजना, लातूर विभागीय समन्वयक डॉ. संदीपान जगदाळे यांनी केले.
दयानंद कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित उद्बोधन कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजाशी जोडले जाते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन डॉ. जगदाळे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य, पर्यावरण संवर्धन, ऐतिहासिक वास्तू व वस्तूंचे जतन व संरक्षण, ग्रामीण विकास, स्वावलंबन तसेच सामाजिक विकास अशा विविध क्षेत्रांत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी युवकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सक्रियपणे कार्य करणे आवश्यक आहे. भारताला जागतिक पातळीवर सक्षम राष्ट्र बनविण्यात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी आणि उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्य करावे आणि समाजातील विविध समस्यांच्या निर्मूलनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुभाष कदम यांनी केले. सूत्रसंचालन पूजा पौळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरती वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. अनिल भुरे, प्रा. सिद्धार्थ भालेराव यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘सेवा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मिती’ या मूल्यांची रुजवणूक होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने