विशाल महारगुडे यांच्या सुमधुर गायनाने ‘आवर्तन’ची १४० वी मासिक संगीत सभा संपन्न

विशाल महारगुडे यांच्या सुमधुर गायनाने ‘आवर्तन’ची १४० वी मासिक संगीत सभा संपन्न
लातूर : आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने गेल्या १३९ महिन्यांपासून अव्याहतपणे आयोजित करण्यात येणाऱ्या मासिक शास्त्रीय संगीत सभेची १४० वी मैफल रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी अष्टविनायक मंदिरातील गणेश हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बीड येथील किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक कलावंत श्री. विशाल महारगुडे यांच्या बहारदार व सुमधुर शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

मैफिलीची सुरुवात त्यांनी राग भूपालीने केली. विलंबित एकतालातील बडा ख्याल ‘मान ले येरी मां’ तसेच द्रुत तीनतालातील छोटा ख्याल ‘सगरी रैन कैसे बिताऊ, सखी री पिया बीन नाही चैन’ सादर करून त्यांनी गायनातील स्वरवैभवाची अनुभूती रसिकांना दिली. त्यानंतर राग मधुकंसमधील मध्यलय अद्धा तीनतालातील ‘माने ना माने ना कान्हा मोरा’ ही बंदिश सादर करून मैफिलीमध्ये वेगळाच रंग भरला.

यानंतर मिश्र पहाडी रागातील दादरा ‘बैरन भई बरखा सखी’, राग दुर्गामधील ‘होरी मनमोहन जा जा होली खेलन’ आणि त्याला जोडून सादर केलेला तराणा ‘धीर धीर ताना देरेना’ यामुळे मैफिलीची रंगत अधिकच वाढली. शेवटी भैरवी रागातील प्रसिद्ध बंदिश ‘जाने नहीं देत मोहे कन्हाई’ सादर करून त्यांनी आपल्या बहारदार गायनाचा समारोप केला.

प्रत्येक रागाच्या अनुषंगाने केलेली दमदार आलापी, सौंदर्यपूर्ण ढंगाने घेतलेले बोलआलाप, बेहलाव्यातील नजाकत, पठणातील शब्द-सुरांची अचूकता तसेच द्रुत लयीत केलेली वैविध्यपूर्ण बोलतान व तानबाजी यामुळे रसिक श्रोते अक्षरशः भावविभोर झाले.

गायनाला संवादिनीची अप्रतिम साथ श्री. हरीश कुलकर्णी यांनी, तर तबल्याची समर्थ साथ चि. समिहन जोशी यांनी केली. कलाकाराला साथसंगत कशी असावी, याचे मूर्तिमंत उदाहरण या दोन्ही कलाकारांनी आपल्या संगतीतून दाखवून दिले. तानपुऱ्यावर संगीत साधक कु. भार्गवी काशीद यांनी साथ दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांनी केले, तर वेणुप्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थितांना कलावंतांचा परिचय करून दिला. या मैफिलीला लातूर शहरातील शास्त्रीय संगीतप्रेमी रसिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.

आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने सुरू असलेल्या या संगीत उपक्रमामुळे लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात शास्त्रीय संगीताच्या मैफिलींची समृद्ध परंपरा जोपासली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने