डॉ. शिवलिंग नागापुरे ‘रिंगण गौरव पुरस्काराने सन्मानित

डॉ. शिवलिंग नागापुरे ‘रिंगण गौरव पुरस्काराने सन्मानित
लातूर -महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित,जिल्हा परिषद कन्या प्रशाला, भादा येथील माध्यमिक शिक्षक डॉ. शिवलिंग उमाकांत नागापुरे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘रिंगण गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
‘द रिंगण लाईव्ह – आवाज महाराष्ट्राचा’ या डिजिटल न्यूज माध्यम समूहाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त लातूर येथील दयानंद सभागृहात रिंगण जीवन गौरव व गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्ह्याच्या जडणघडणीत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत डॉ. शिवलिंग नागापुरे यांना ‘रिंगण गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख, विधान परिषदेचे आमदार बसवराजजी पाटील, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आणि डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते डॉ. नागापुरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, माजी आमदार वैजनाथदादा शिंदे, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती संतोष सोमवंशी, ‘रिंगण लाईव्ह’चे मुख्य संपादक राजू पाटील, स्वागताध्यक्ष अमृत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला येथील अध्यक्ष शिवचरण धाराशिवे यांना यावेळी ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
डॉ. शिवलिंग नागापुरे यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘रिंगण गौरव पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातील सहकारी, विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार तसेच विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने