जलसंधारण पोस्टर स्पर्धेत ३५१ विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

जलसंधारण पोस्टर स्पर्धेत ३५१ विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर व मृद व जलसंधारण विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसंधारण’ विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत संस्थेतील विविध विभागांतील तब्बल ३५१ विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. नाईक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस. एस. प्रभुणे, प्राचार्य, PLGIET, लातूर उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर, पावसाचे पाणी साठवण व जमिनीत जिरविण्याच्या विविध पद्धती यावर आकर्षक पोस्टर्स सादर केली. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलव्यवस्थापन आणि पाणी बचतीच्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्यात आल्या.
स्पर्धेचे मूल्यमापन मृद व जलसंधारण विभागातील उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचा समावेश असलेल्या १० अधिकाऱ्यांच्या समितीने केले. विषयाची मांडणी, तांत्रिक अचूकता, नाविन्यपूर्णता, सर्जनशीलता आणि सादरीकरण या निकषांवर विद्यार्थिनींचे मूल्यमापन करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांना विभागनिहाय प्रथम क्रमांकाचे १, द्वितीय क्रमांकाचे २, तृतीय क्रमांकाचे २ व उत्तेजनार्थ २, अशी एकूण सात पारितोषिके देण्यात आली. या पारितोषिकांची एकूण रक्कम २२ हजार रुपये आहे. तसेच सहभागी झालेल्या सर्व ३५१ विद्यार्थिनींना IEI (The Institution of Engineers (India)) Student Chapter च्या माध्यमातून प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य एस. डी. राठोड यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे समन्वयक एस. पी. गिरगावकर यांनी जबाबदारी पार पाडली, तर नियोजनाची जबाबदारी जिमखाना उपाध्यक्ष पी. डी. जगताप यांनी सांभाळली. संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
जलसंधारणाच्या महत्त्वाबाबत विद्यार्थिनींमध्ये जनजागृती करण्यासोबतच त्यांच्या तांत्रिक ज्ञानाला, सर्जनशीलतेला आणि नाविन्यपूर्ण विचारांना व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम ठरला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने