लहानपणी या सुगीच्या दिवसात शेतशिवारात किती लगबग पाहायला मिळायची...... अन् आज!

लहानपणी या सुगीच्या दिवसात शेतशिवारात किती लगबग पाहायला मिळायची...... अन् आज!
   खरच पाऊस दगा देतो तेव्हा केवळ शिवारच करपतं असं नाही तर अशा,आकांक्षा,स्वप्न सारं काही करपून जातं. 
यंदा मोसमी पावसानं दगा दिला,नगदी पैशाची पिकं हातची गेली,शिवारातलं पाणी आटत चाललंय,तापमानाचा पारा वाढत चाललाय,आता परतीच्या पावसाचाही भरोसा नाही.
  काल गावाकडे शिवारात फिरत असताना शेतात विश्वनाथ जागजे मामा वय वर्ष ८५ हे शेतकरी या वयात आपली जनावरं चारत असताना दिसून आले,मी त्यांची आवर्जून भेट घेतली.(दोन वर्षापूर्वी आम्ही पुण्याहून त्यांच्या दोन्ही डोळ्याची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आणली होती) त्यांना मी बरंय का जागजे मामा असं म्हणताच त्यांच्या तोंडून पहिलाच शब्द आला "सगळच गेलय" जे जवळचं भांडवल आहे ते जमिनीत ओतलं गेलं अन् हाताला काहीच लागलं नाही....! हे ऐकलं की अक्षरशः काळजात चर्रर केलं.ग्रामीण भागात मिळकतीचे स्त्रोत आटल्यानंतरची हाताश जाणीव सध्या सर्वत्र अशीच दिसू लागली आहे.लहानपणी असं चित्र नव्हतं.या दिवसात किती लगबग पाहायला मिळायची,
शेत शिवारातील शेतमाल घरात येण्याचे हे दिवस,शिवारात वेगळच चैतन्य जाणवू लागायचं.कुठे साळी काढायला सुरू तर कुठे साळ बडवत असलेले चित्र दिसायचे,हायब्रीडच्या कंणसाचे ढिगारेच्या ढिगारे लागायचे,तीनकांडी,पिवळीच्या मोठ-मोठ्या बनीमी-गंजी रचून ठेवायच्या (रबीच्या पेरणीनंतर सवड मिळेल तेव्हा रास करायला)तुरीचा भर थोडा शेवटी यायचा,कारळं, अंबाडी,तीळ,उडीद,मुग, भुईमूग इत्यादी बहु पिकाच्या राशीनं व त्याच्या थापिवर थापी अन् गटूडेच्या गटूडे घरात पसरलेले.तर घराच्या अंगणात-पटांगणात,गावात मिळेल तिथल्या मोकळ्या जागेत हे वाण वाळू घातलेलं दिसायचं.अनेकांच्या पत्र्यावर, माळवदावर अशा अनेक ठिकाणी लाल भडक मिरच्या वाळू घातलेल्या असायच्या.ते दिवस,ती लगबग,ती सुगी आता पूर्णतः बदलून गेली आहे.त्याकाळी कमी गरजात अधिक सुख उपभोगणाऱ्या गावात आणि शिवारभर सध्या सन्नाटा पसरलेला दिसून येत आहे.वातावरणात एक उदासी आहे,निराशेचं मळभ दाटून आल्याचं दिसून येत आहे. आता गरजा वाढल्या आहेत, हाती पैसा येण्याचे एक-एक स्त्रोत आटत चाललेले आहेत, हाताला काम नाही म्हणून मराठवाड्यातून गांवच्या गावं रिकामी झालेली पाहायला मिळतील अशी स्थिती आहे. शिवारात न पिकल्याने हाताला काम नाही,गुर्हाळाचा काळ संपलाय,साखर कारखाने फार काळ चालणार नाहीत,बेरोजगारांच्या हाताला काम मिळतील अशी मोठमोठे उद्योगधंदे या भागात नाहीत. सुशिक्षित बेकार आणि काही शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून खरेदी केलेल्या ट्रॅक्टर,जेसीबी सारख्या वाहनांना म्हणावी तशी कामं नाहीत,चाऱ्या अभावी दुधाळ जनावरांची दुधं कमी झालीत, आटलीतच म्हणायला काही हरकत नाही.रोजगाराना रोजगारांची हमी देणारी मनरेगा आणि आत्ताची व्हिबीजी-रामजी अर्थातच आधीची रोहयो ही इथे व्यवस्थित राबवली जात नाही,आत्ताची रोहयो ही फक्त धनदांडग्या आणि गुत्तेदार लोकांसाठी राबवली जात आहे.अर्थातच हाताला काम मागणाऱ्या मजुरासाठी नाही.एकूणच रोजगाराचा अभाव छोट्या-मोठ्या धंद्यांना बसणारी झळ,शेतीच्या उत्पादनात झालेली मोठी घट, यामुळे सर्वत्र शुकशुकाट आहे.एकीकडे या सुगीच्या दिवसात अशी लगबग असायची की,पिकाच्या राशींच्या राशी घरी यायच्या दिवाळी तोंडावर असायची,कुठे मुराळी पाठवायचा तर कुठे मुराळी यायचा हा एक वेगळाच माहोल असायचा,दिवाळी सुरू होण्या अगोदरच कुठेतरी एखादा फटाक्याचा आवाज ऐकू यायचा,त्यामुळे दिवाळी सणाची वातावरण निर्मिती व्हायची अन मग दिवाळीत दिवाळी एवढी आनंदात साजरी व्हायची की त्याचा उत्साह अर्थातच दिवाळी ही बसवन्ना पौर्णिमेपर्यंत राहायची.अन् आज याच दिवसात आवर्षणाचा दाह सोसणाऱ्या गाव-खेड्यातल्या माणसांना हाताश होऊन कामासाठी आणि जगण्यासाठी शहराच्या दिशेनं निघावं लागत आहे.अनेक घरांना कुलपं लागत आहेत.दसरा दिवाळीनंतर याची दाहकता अधिकच वाढलेली दिसेल.असंच काहीतरी दिसतय.आपल्या गावाला आणि मराठवाड्याला वाचवण्यासाठी पर्याय एकच..! 
गावागावात शिरपूर पॅटर्न राबवावा लागेल,(नेमका शिरपूर पॅटर्न म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊन)शेतातलं पाणी शेतात, शिवारातलं पाणी शिवारात आणि गावातलं पाणी गावात अडविणे आणि जिरविणे,वृक्ष लावणे संगोपन करणे आणि वाढविणे.सरकारने फक्त एवढेच काम हाती घ्यावे आणि त्याला देशातले कारखानदार,मोठमोठ्या मंदिराचे विश्वस्त,उद्योगपती,दानशूर आणि यातील तज्ञांनी मदत करावी व या कामी गावा- गावातल्या युवकांनी-लोकांनी गट-तट जात-पात,भेदभाव,वैचारिक मतभेद बाजूला ठेवून आपला सहभाग अर्थातच लोकसहभाग वाढवून योगदान द्यावे लागेल.

   शिवकुमार नागराळे ,मनसे,जिल्हाध्यक्ष लातूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने