जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिरात १५० ज्येष्ठांचा सहभाग
लातूर : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबर रोजी लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे १५० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे आणि त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराची सुरुवात उपायुक्त अविनाश देवसटवार, प्र. सहायक आयुक्त विलास केंद्रे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिणे, सहसचिव शहाजी घाडगे आणि कोषाध्यक्ष वसंत बेडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी शिबिरात आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा समाज कल्याण विभागाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या शिबिरामध्ये लातूर महानगरपालिकेच्या विशेष आरोग्य वैद्यकीय पथकाने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी केली. लातूर शहरातील सुमारे १५० ज्येष्ठ नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग नोंदवत या सुविधेचा लाभ घेतला.
*निवासी शाळा व वसतिगृहांमध्येही विविध उपक्रम*
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहांमध्येही विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त अविनाश देवसटवार, प्र. सहायक आयुक्त विलास केंद्रे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सहायक लेखाधिकारी श्रीकांत सराफ, कार्यालय अधीक्षक राजेश सुरकूटलावार यांच्यासह समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा