दुष्काळग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्या; युवक काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
निलंगा : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना तातडीने आर्थिक मदत तसेच आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज निलंगा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची टंचाई, ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च यामुळे दुष्काळग्रस्त कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी युवक काँग्रेसने शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये विशेष आर्थिक मदत, पीक विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने अदा करणे, शेतमजुरांना प्रत्येकी २५ हजार रुपये आर्थिक मदत, टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा आणि गरजेनुसार चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली.
तसेच दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, शहरात शिक्षणासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व भोजन भत्ता द्यावा, ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे आयोजित करावीत, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि निलंगा तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचे विशेष सर्वेक्षण करून तातडीने मदत द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.
युवक काँग्रेसच्या वतीने प्रशासनासोबत समन्वय साधून दुष्काळग्रस्त नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनाने दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच दुष्काळग्रस्तांच्या खात्यावर प्रत्यक्ष आर्थिक मदत जमा करून त्यांच्या मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस महेश लहू म्हेत्रे, निलंगा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष मदन बिरादार, निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमोल नवटके, प्रशांत वंजारवडे, अक्षय पाटील, तानाजी मोरे, लक्ष्मण मोरे, समीर पटेल यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा