“साईश्रद्धा आमच्यासाठी ओझे नाही; ती आमच्या जगण्याची प्रेरणा आहे!” — वडील संजय राजुळे

“साईश्रद्धा आमच्यासाठी ओझे नाही; ती आमच्या जगण्याची प्रेरणा आहे!” — वडील संजय राजुळे


लातूर : सकाळ होते… दिवसाची सुरुवात होते… आणि साईश्रद्धाच्या आई सावित्री राजुळे यांची मुलीच्या सेवेसाठी धावपळ सुरू होते. साईश्रद्धाला उठवण्यापासून ते तिला जेवण भरवणे, पाणी पाजणे आणि दिवसभर तिची काळजी घेण्यापर्यंत प्रत्येक क्षण आईच्या मायेने व्यापलेला असतो. जेवणासाठी तब्बल एक तास, तर पाणी पाजण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात; तरीही आईच्या चेहऱ्यावर ना थकवा, ना तक्रार. गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेला हा संघर्ष आजही तितक्याच प्रेमाने सुरू आहे.

सेरेब्रल पाल्सीग्रस्त १३ वर्षीय साईश्रद्धा संजय राजुळे स्वतःहून उठू, बसू किंवा चालू शकत नाही. जेवणे, पाणी पिणे यासह दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी तिला सतत मदतीची गरज असते. तिच्या संगोपनासाठी आई-वडिलांना दिवस-रात्र तिच्यासोबत राहावे लागते.

“माझ्या पत्नीचा मला खूप अभिमान आहे. ती सकाळपासून रात्रीपर्यंत साईश्रद्धाची अत्यंत प्रेमाने काळजी घेते. जेवणासाठी तास लागला किंवा पाणी पाजण्यासाठी २०-२५ मिनिटे लागली तरी ती कधीही कंटाळत नाही. तिच्या या त्यागाला शब्द अपुरे आहेत,” असे वडील संजय राजुळे भावुकपणे सांगतात.

साईश्रद्धाच्या जन्मानंतर राजुळे कुटुंबाचे आयुष्यच बदलले. बाहेर जाणे, कार्यक्रमांना उपस्थित राहणे किंवा प्रवास करणे यापूर्वी तिच्या गरजांचा विचार करावा लागतो. मात्र तिच्या चेहऱ्यावरील एक हास्य आई-वडिलांचा सगळा थकवा दूर करते.

“साईश्रद्धा स्वतःहून अनेक गोष्टी करू शकत नाही; पण तिचं एक हास्य आम्हाला जगण्याची नवी ताकद देतं. ती आमच्यासाठी ओझे नाही, तर आमच्या जगण्याची प्रेरणा आहे,” असे संजय राजुळे म्हणतात.

गर्भवती मातांना आवाहन

सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना नियमित आरोग्य तपासणीचे आवाहन राजुळे यांनी केले आहे.

“मी डॉक्टर नाही; हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. गर्भधारणेदरम्यान नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहावे. आवश्यक तपासण्या व सोनोग्राफी वेळेवर करून घ्यावी. काही शंका किंवा जोखीम असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि गरज भासल्यास दुसरे वैद्यकीय मत घ्यावे,” असे त्यांनी सांगितले.

“माझ्या मुलीच्या जन्मानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मात्र कोणाला दोष देण्यापेक्षा इतर पालकांनी वेळेवर जागरूक व्हावे, हीच माझी इच्छा आहे. विशेष मुलांना दयेपेक्षा प्रेम, स्वीकार आणि सन्मानाची गरज आहे,” असेही राजुळे म्हणाले.

“तिची पावले चालत नसतील, पण तिच्यामुळे आमच्या आयुष्याला चालण्याची दिशा मिळाली आहे…”

— संजय राजुळे
साईश्रद्धाचे वडील

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने