दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचा निर्णय स्वागतार्ह-डॉ.हुलगेश चलवादी

 दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्याचा निर्णय स्वागतार्ह-डॉ.हुलगेश चलवादी 


 पुणे:-राज्यातील दुष्काळी तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य सरकारचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे प्रदेश उपाध्यक्ष तथा चलवादी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
राज्यातील अनेक भागांत अपुऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे नुकसान, उत्पन्नातील घट आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण पडतोय. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काचा अतिरिक्त भार पालकांना सहन करावा लागू नये, यासाठी राज्य सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण आहे. अस्मानी संकटामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे निर्माण होऊ नयेत, ही या निर्णयामागील सकारात्मक भूमिका असल्याचे डॉ.चलवादी यांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ देण्यात येत आहे. त्याचबरोबर बुधवारी राज्यातील आणखी ४० तालुके दुष्काळी म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या ३०५ झाली असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. 
शिक्षण ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासुन वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाने अशा लोकहितकारी निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच परीक्षा शुल्क माफीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ द्यावे, अशी अपेक्षाही डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने