लातूर जिल्हा आयुष कक्षाची उल्लेखनीय कामगिरी; सेवा संकल्प अभियानांतर्गत २० हजारांपेक्षा अधिक रुग्णांना आरोग्यसेवा

 लातूर जिल्हा आयुष कक्षाची उल्लेखनीय कामगिरी; सेवा संकल्प अभियानांतर्गत २० हजारांपेक्षा अधिक रुग्णांना आरोग्यसेवा


लातूर : लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत लातूर जिल्हा आयुष कक्षाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून, जिल्ह्यातील २० हजारांपेक्षा अधिक रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणे, प्रतिबंधात्मक आरोग्य काळजीला प्रोत्साहन देणे आणि आयुष उपचार पद्धतींचा व्यापक प्रसार करणे या मुख्य उद्देशाने हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जात आहे.

लातूर जिल्ह्यात एकूण १७ आयुष आरोग्य संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना विविध उपचार पद्धतींद्वारे आरोग्य सेवा दिली जात आहे. यामध्ये सिंधगाव, दर्जी बोरगाव, पाटोदा, नागनाथ वाडवळ, येरोळ, विळेगाव, देवताळा आणि तळीखेड येथील आठ आयुष दवाखाने तसेच उदगीर, लातूर, निलंगा, मुरुड, औसा, बाभळगाव, चाकूर, अहमदपूर आणि कासारशिरशी येथील नऊ आयुष विंगचा समावेश आहे. या सर्व केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, विविध आयुष उपचार आणि निरोगी जीवनशैलीबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन पुरविले जात आहे.

सेवा संकल्प अभियानांतर्गत आतापर्यंत ८९ आयुष आरोग्य शिबिरे आणि ९३ योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गर्भवती माता व महिलांमधील अॅनिमिया प्रतिबंध, पोषणविषयक मार्गदर्शन व आरोग्य संवर्धनासाठी ४५ विशेष समुपदेशन सत्रे घेण्यात आली आहेत. याशिवाय १६ पेक्षा अधिक ग्रामसभांमध्ये आरोग्यविषयक सविस्तर माहिती देऊन व्यापक जनजागृती करण्यात आली आहे.

आयुर्वेदातील विविध पारंपरिक उपचार व तपासण्यांद्वारे रुग्णांवर वैद्यकीय निकषानुसार उपचार केले जात आहेत. यामध्ये आतापर्यंत १२० पेक्षा अधिक स्नेहन व स्वेदन उपचार, २५७ अग्निकर्म उपचार, ११० विद्धकर्म उपचार, ४३ रक्त परीक्षणे, ५०० पेक्षा अधिक प्रकृती परीक्षणे आणि ८७५ पेक्षा अधिक नाडी परीक्षणे पूर्ण करण्यात आली आहेत. सर्व उपचार पात्र आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फतच केले जात असून महिलांचे आरोग्य, संतुलित आहार, योग्य दिनचर्या आणि योगाभ्यासावर विशेष भर दिला जात आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर यांच्या आयुष टीममार्फत राबवले जात आहेत.

लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सेवा संकल्प अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आयुष आरोग्य शिबिरे, योग सत्रे आणि आरोग्यविषयक जनजागृती उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून संतुलित आहार, योगाभ्यास व निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात एकाच छताखाली ॲलोपॅथीसोबतच आयुष उपचार पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना दर्जेदार प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मिळत असून सेवा संकल्प अभियानादरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष संस्थांना भेट देऊन या सेवांचा लाभ घ्यावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने