उदगीर-जळकोट मतदारसंघातील महिलांशी डॉ. गोऱ्हे यांचा व्हिडिओ संवाद; पाणीटंचाई, चारा आणि शेतकरी कुटुंबांच्या प्रश्नांवर पाठपुरावा सुरू

दुष्काळग्रस्त महिलांच्या दिवाळीत आनंदाचा क्षण; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने लाडू-चिवड्याचे वाटप

उदगीर-जळकोट मतदारसंघातील महिलांशी डॉ. गोऱ्हे यांचा व्हिडिओ संवाद; पाणीटंचाई, चारा आणि शेतकरी कुटुंबांच्या प्रश्नांवर पाठपुरावा सुरू
लातूर : दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींसाठी दिवाळीनिमित्त विशेष फराळ वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात महिलांना लाडू आणि चिवड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, "दुष्काळ आणि टंचाईच्या परिस्थितीतही तुमच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून समाधान वाटते. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्याला संकटातही एकत्र राहण्याची प्रेरणा देतात. दिवाळीनिमित्त तुमच्यापर्यंत पोहोचवलेला हा फराळ म्हणजे आमच्या प्रेमाची छोटीशी भेट आहे."

यापूर्वी दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यात ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि इतर मूलभूत समस्यांबाबत निवेदने दिली होती. या सर्व निवेदनांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विभागीय आयुक्तांकडे लेखी पाठपुरावा करण्यात आल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच ज्या ठिकाणी शक्य असेल तेथे चारा लागवड आणि पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर टँकरची व्यवस्था आणि आवश्यक पाहणी करण्याबाबत माहिती दिली. तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजूर कुटुंबांतील मुलींच्या विवाहासाठी उपलब्ध मदतीचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने संबंधित कुटुंबांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या उपक्रमाचे संयोजन संपर्कप्रमुख आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोळं, महिला संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ महिला, लहान मुलांसह माता-भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
डॉ. गोऱ्हे यांनी व्हिडिओ संवादादरम्यान उपस्थित महिलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील पाणीटंचाई, चारा आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त भागातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने