आकाशदीपाची परंपरा : श्रद्धा, संस्कृती आणि प्रकाशाचा आध्यात्मिक संगम!

आकाशदीपाची परंपरा : श्रद्धा, संस्कृती आणि प्रकाशाचा आध्यात्मिक संगम!
दिवाळीच्या मंगलपर्वात घराबाहेर उंचावर लावला जाणारा आकाशकंदील म्हणजे केवळ सजावटीची वस्तू नसून तो श्रद्धा, भक्ती, पितृस्मरण आणि सुख-समृद्धीचे प्रतीक मानला जातो. बदलत्या काळानुसार त्याचे स्वरूप बदलले असले, तरी त्यामागील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आजही कायम आहे.
ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार, आकाशदीप किंवा आकाशकंदील लावण्याचा काळ आश्विन शुक्ल एकादशी (पाचू एकादशी किंवा कोरडी एकादशी) ते कार्तिक शुक्ल एकादशी (तुळशी विवाह) असा मानला जातो. या संपूर्ण महिन्यात घराबाहेर उंच जागी, विशेषतः पूर्व दिशेला आकाशदीप प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या प्रकाशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा, मांगल्य आणि सुख-समृद्धी नांदते.

आकाशकंदील म्हणजेच शास्त्रातील 'आकाशदीप'. हिंदू धर्मपरंपरेत आणि पौराणिक कथांमध्ये या आकाशदीपाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामागे अनेक रंजक आणि आध्यात्मिक कथा सांगितल्या जातात.

भीष्म पितामह आणि पितृस्मरणाची परंपरा

महाभारतातील मान्यतेनुसार, कुरुक्षेत्राच्या युद्धात असंख्य वीर योद्ध्यांना वीरमरण आले. युद्धानंतर कार्तिक महिन्यात भीष्म पितामहांनी दिवंगत वीरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आणि पितरांच्या स्मरणार्थ उंच बांबूवर दीप प्रज्वलित करण्याची परंपरा सुरू केली, अशी एक धार्मिक आख्यायिका सांगितली जाते. या आकाशदीपाच्या प्रकाशातून मृतात्म्यांना परलोकाचा मार्ग मिळावा, अशी त्यामागील भावना होती. त्यामुळे आकाशदीपाला पितृस्मरण आणि पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते.

प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी उजळली अयोध्या

त्रेतायुगातील रामायणकालीन कथेनुसार, प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून कार्तिक अमावस्येला अयोध्येत परतले. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यावासीयांनी संपूर्ण नगरी दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकली होती. प्रभू रामांना अयोध्येचा मार्ग दूरवरून दिसावा, या भावनेतून उंच ठिकाणी दिवे लावण्यात आले, अशी लोकमान्यता आहे. त्यामुळे आकाशदीप हा स्वागत, आनंद आणि विजयाच्या प्रकाशाचे प्रतीक मानला जातो.

भगवान विष्णू, बळीराजा आणि समृद्धीची मान्यता

वामन अवतारात भगवान विष्णूंनी राजा बळीला पाताळलोकाचे अधिपती बनवले, अशी पौराणिक कथा आहे. बळीराजाच्या दानशूरतेवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला वरदान दिले, अशी मान्यता आहे. कार्तिक महिन्यात दीपदान आणि आकाशदीप प्रज्वलित करण्याच्या परंपरेला या कथेशीही जोडले जाते. घराबाहेर आकाशदीप लावल्याने घरात दरिद्रता दूर होऊन लक्ष्मीचा वास राहतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

महालक्ष्मीच्या स्वागतासाठी आकाशदीप

पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक अमावस्येच्या रात्री माता महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमणासाठी येते. या दिवशी तिचे स्वागत करण्यासाठी घराची स्वच्छता करून अंगणात रांगोळी, पणत्या आणि घराच्या उंच ठिकाणी आकाशकंदील लावला जातो. आकाशकंदिलाचा प्रकाश म्हणजे माता लक्ष्मीचे स्वागत आणि घरातील सुख-समृद्धीची कामना, अशी श्रद्धा आहे.

पेशवेकाळापासून आधुनिक काळापर्यंतचा प्रवास

आकाशदीपाची परंपरा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नाही, तर तिला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भही आहेत. इतिहासातील उल्लेखांनुसार, पेशवेकाळात आणि मराठा साम्राज्याच्या काळात दिवाळीच्या सणात किल्ले, मंदिरे आणि उंच ठिकाणी मोठे दिवे व कंदील लावले जात असत. त्यामुळे परिसर प्रकाशाने उजळून निघत असे.

पूर्वीच्या काळात आकाशकंदील घरीच तयार केले जात. बांबूच्या बारीक काड्यांची चौकट तयार करून त्यावर रंगीत जिलेटिन पेपर किंवा रंगीत कागद चिकटवला जात असे. डिंकाच्या साहाय्याने तयार केलेल्या या कंदिलात तेलाचा दिवा किंवा प्रकाशाची व्यवस्था केली जात असे. पारंपरिक कारंजा आणि ताऱ्याच्या आकाराचे कंदील घराघरांत आकर्षणाचे केंद्र असत.

आधुनिकतेच्या प्रवाहात बदललेले आकाशकंदील

काळ बदलला, तंत्रज्ञान विकसित झाले आणि आकाशकंदिलाचे स्वरूपही बदलत गेले. आज बाजारपेठेत विविध आकार, रंग आणि आकर्षक डिझाइनचे आकाशकंदील उपलब्ध आहेत. पारंपरिक कागदी कंदिलांसोबत प्लास्टिक, कापड, लाकूड आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेले कंदीलही पाहायला मिळतात.

पूर्वी तेलाच्या दिव्याने उजळणाऱ्या आकाशकंदिलात आता रंगीबेरंगी एलईडी बल्ब, इलेक्ट्रिक लाइट्स आणि आकर्षक रोषणाईचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे पणत्यांच्या स्वरूपातही मोठे बदल झाले आहेत. मातीच्या पारंपरिक पणत्यांसोबत इलेक्ट्रिक, प्लास्टिक, मेणबत्ती, पाण्यावर तरंगणाऱ्या आणि विविध सजावटीच्या पणत्या बाजारात उपलब्ध आहेत.

मात्र, या सर्व बदलांमध्ये आकाशकंदिलामागील मूळ भावना तीच आहे. अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे नेणारा हा प्रकाश जीवनात नवी ऊर्जा निर्माण करतो.

आकाशकंदील : आठवणींचा, संस्कृतीचा आणि मांगल्याचा प्रकाश

आकाशकंदील हा केवळ दिवाळीतील सजावटीचा भाग नाही, तर तो भारतीय संस्कृती, परंपरा, श्रद्धा आणि कौटुंबिक आनंदाचे प्रतीक आहे. पूर्वी घरातील लहान-मोठे सदस्य एकत्र येऊन बांबूच्या काड्यांपासून कंदील तयार करत असत. त्या प्रक्रियेतून निर्माण होणारा आनंद, एकत्रितपणा आणि सर्जनशीलता आजही अनेकांच्या आठवणीत जिवंत आहे.

आज बाजारात कितीही आकर्षक आणि आधुनिक कंदील आले, तरी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या पारंपरिक कंदिलाची सर कशालाच येत नाही. कारण त्या कंदिलात केवळ प्रकाश नसतो, तर बालपणीच्या आठवणी, कुटुंबाचा सहवास आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेली नाळ असते.

आकाशकंदीलाचा प्रकाश आपल्याला एक सुंदर संदेश देतो—जीवनात कितीही अंधार असला, तरी आशेचा एक दिवा प्रज्वलित केला की नवी वाट सापडू शकते. म्हणूनच आकाशदीप हा केवळ आकाशात लटकणारा कंदील नसून प्रत्येकाच्या मनात सकारात्मकतेची ज्योत पेटवणारा प्रकाश आहे.

आकाशकंदिलाच्या प्रकाशातून...

बांबूच्या काड्या अन् जिलेटिनचा कागद,
आठवण करून देतो जुन्या त्या काळाची गोड.

आकाशकंदील हा केवळ दिवा नाही,
ती ओळख आहे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची.

अंधाराच्या छाताडावर प्रकाशाची रेघ,
नभातून उतरला जणू चांदण्यांचा मेघ.

घराच्या त्या कोपऱ्यात डोलतो हा कंदील,
मनामधला अंधारही दूर करील...

भीष्मांनी लावला पितरांच्या स्मरणासाठी,
अयोध्या उजळली प्रभू रामांच्या स्वागतासाठी.

लक्ष्मीच्या स्वागताला उंच नभात टांगला,
मांगल्याचा हा दिवा घराघरांत शोभला.

रंगीत कागद अन् बांबूच्या काड्या,
जोडतात आठवणींच्या नात्यांच्या नाड्या.

सुख-समृद्धी घेऊन येवो नवी पहाट,
आकाशकंदील दाखवो भाग्याची नवी वाट!

दीपप्रज्वलनाचा पवित्र मंत्र

दिवाळीत आकाशकंदील किंवा पणती प्रज्वलित करताना पुढील दीपमंत्र म्हणण्याची परंपरा आहे.

दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते॥

मंत्राचा अर्थ : दिव्याची ज्योत ही परब्रह्म स्वरूप आहे. ही ज्योत भगवान विष्णू अर्थात जनार्दनाचे प्रतीक आहे. हे दीपज्योती, माझ्या जीवनातील अज्ञान, पाप आणि नकारात्मकता दूर कर. अशा या पवित्र दीपज्योतीला माझे नमन असो.

अशा प्रकारे आकाशदीप हा श्रद्धा, भक्ती, पितृस्मरण, परंपरा आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम आहे. दिवाळीच्या मंगलपर्वात आकाशात उंचावणारा हा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आनंद, आरोग्य, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा!

लेखिका : ज्योतिषाचार्य डॉ. सौ. सृष्टी मोरे (पंडित)
सृष्टी ॲस्ट्रो गुरुकुल, कोल्हापूर
ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, मानसोपचार समुपदेशन व आध्यात्मिक प्रशिक्षक, अभ्यासक, लेखिका व मार्गदर्शक
अनुभव : २२+ वर्षे
संपर्क : ९६३७१२५११९

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने