नांदेडच्या ४९ वर्षीय आरोपीस अटक; गुटख्यासह स्कॉर्पिओ वाहन पोलिसांच्या ताब्यात
उदगीर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या एका आरोपीला उदगीर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटख्यासह महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा एकूण १३ लाख ७७ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उदगीर येथील लोणी मोड परिसरात महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (क्रमांक MH-14-CH-3232) या वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि रजनीगंधा असे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले. पोलिसांनी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ असा एकूण १३ लाख ७७ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी निसार हसनमिया शेख (वय ४९, रा. गवळीपुरा, स्टेशन रोड, नांदेड) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ६२ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तिडके करीत आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डी. डी. गाडे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा