नागरिकांच्या समस्या थेट डीआयजींच्या दरबारात; २५ तक्रारींवर कार्यवाहीचे निर्देश
लातूर : नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी पोलीस आणि जनता यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ‘जनसंवाद’ उपक्रमांतर्गत लातूर येथे नागरिकांशी थेट संवाद साधला. ६ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित या उपक्रमात जिल्ह्यातील एकूण २५ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज सादर केले. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये पोलीस-नागरिक संबंध अधिक दृढ व्हावेत, नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे जलदगतीने निराकरण व्हावे आणि पोलीस प्रशासनाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे, या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी ‘जनसंवाद’ हा उपक्रम सुरू केला आहे.
लातूर जिल्ह्याच्या कामगिरीचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक उमाप हे ६ नोव्हेंबर रोजी सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. यावेळी दुपारी ३ ते ५ या वेळेत त्यांनी जिल्ह्यातील तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या उपक्रमात एकूण २५ नागरिकांनी आपले लेखी तक्रार अर्ज त्यांच्याकडे सादर केले.
या तक्रारींमध्ये मालमत्तेसंबंधी वाद, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, सायबर फसवणूक, पोलीस संरक्षणाची मागणी, कौटुंबिक वाद तसेच जिवे मारण्याच्या धमक्यांसारख्या विविध विषयांचा समावेश होता. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांच्या जलद निवारणासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच ‘संवेदना’ ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. ‘जनसंवाद’ उपक्रमादरम्यान प्राप्त झालेले सर्व अर्ज या प्रणालीच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे.
या उपक्रमावेळी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
‘जनसंवाद’ आणि ‘संवेदना’ या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यावरील कार्यवाहीचा पाठपुरावा करण्यावर पोलीस प्रशासनाने भर दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा