चाकूर पोलिसांच्या तपासाला यश; लातूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
लातूर : अवघ्या १० वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक ३, लातूरचे न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. चाकूर पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित बालिका आपल्या राहत्या घरी खेळत होती. यावेळी आरोपी गोविंद साधू नाईकवाडे (वय ५०, रा. उजळंब, ता. चाकूर, जि. लातूर) याने घरातील खोलीत प्रवेश केला. त्यानंतर बालिकेच्या तोंडाला व गालाला पावडर लावून तिच्या छातीला दाबत तिच्यासोबत अश्लील चाळे केले. दरम्यान, बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकून तिची आई व घरातील इतर व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली आणि बालिकेची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.
या घटनेप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(२), ३३३ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी केला. तपासादरम्यान उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. विशेष पोक्सो खटला क्रमांक १५३/२०२४ मध्ये सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक ३, लातूरचे न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी आरोपी गोविंद साधू नाईकवाडे यास दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी बाजू मांडली. पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार चंद्रकांत राचमाळे व प्रमोद तरडे यांनी काम पाहिले. तसेच ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर मनाळे यांनी न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुषंगाने समन्वय साधला. पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला.
बालकांविरुद्ध होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये प्रभावी तपास, सक्षम न्यायालयीन पैरवी आणि ट्रायल मॉनिटरिंग सेलच्या समन्वयातून दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस कटिबद्ध असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा