इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन ₹१८ हजारांवरून ₹३० हजार करून खासगी महाविद्यालयांतील विद्यावेतनाची अनियमितता दूर करा: अभाविप

इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन ₹१८ हजारांवरून ₹३० हजार करून खासगी महाविद्यालयांतील विद्यावेतनाची अनियमितता दूर करा: अभाविप

लातूर -महाराष्ट्रातील वैद्यकीय, आयुष व फिजिओथेरपी अभ्यासक्रमांच्या इंटर्न विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनासंदर्भातील विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना निवेदन सादर केले आहे. शासकीय व अनुदानित वैद्यकीय तसेच आयुष महाविद्यालयांतील इंटर्न विद्यार्थ्यांचे विद्यावेतन दरमहा ₹१८,००० वरून ₹३०,००० करावे, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यावेतनाची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि फिजिओथेरपीच्या इंटर्न विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याबाबत स्पष्ट धोरण निश्चित करावे, अशा मागण्या अभाविपने केल्या आहेत.

वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम टप्प्यातील इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णसेवा, आपत्कालीन सेवा आणि विविध वैद्यकीय प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी लागते. रुग्णसेवेतील या योगदानाच्या तुलनेत मिळणारे विद्यावेतन अपुरे असून, वाढती महागाई, निवास, प्रवास आणि दैनंदिन गरजांचा खर्च लक्षात घेता विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यावेतनाचाही तुलनात्मक आढावा घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शासकीय व अनुदानित वैद्यकीय तसेच आयुष महाविद्यालयांतील इंटर्न विद्यार्थ्यांचे विद्यावेतन दरमहा ₹३०,००० करण्यात यावे, अशी मागणी अभाविपकडून करण्यात आली आहे.

राज्यातील काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्ण विद्यावेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विद्यार्थ्यांकडून रुग्णालयीन सेवा घेतली जात असताना त्यांना नियमानुसार देय असलेले विद्यावेतन न मिळणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लागू असलेल्या शासन निर्णयांची व संबंधित नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. महाविद्यालयांचे नियमित लेखापरीक्षण व तपासणी करून विद्यावेतन वितरणाची खातरजमा करावी, थकीत विद्यावेतन तातडीने देण्याचे निर्देश द्यावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.

फिजिओथेरपी अभ्यासक्रमांच्या इंटर्न विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्नही गंभीर असून, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपदरम्यान विद्यावेतन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही महाविद्यालयांमध्ये विद्यावेतन देण्याऐवजी विद्यार्थ्यांकडून इंटर्नशिपसाठी शुल्क आकारले जात असल्याचेही निदर्शनास येत आहे. इंटर्नशिपच्या काळात विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याऐवजी त्यांना न्याय्य विद्यावेतन मिळणे आवश्यक आहे. यासाठी फिजिओथेरपीच्या इंटर्न विद्यार्थ्यांसाठी स्पष्ट धोरण निश्चित करावे, इंटर्नशिपच्या नावाखाली नियमबाह्य शुल्क आकारण्यास प्रतिबंध करावा आणि संबंधित महाविद्यालयांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिषदेकडून करण्यात आली आहे.

अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, “वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम टप्प्यात इंटर्न विद्यार्थी प्रत्यक्ष रुग्णसेवेची जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या या सेवेची योग्य दखल घेऊन त्यांना उचित विद्यावेतन मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शासकीय व अनुदानित वैद्यकीय तसेच आयुष महाविद्यालयांतील इंटर्न विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ₹३०,००० करणे, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यावेतनाच्या अनियमिततेवर नियंत्रण आणणे आणि फिजिओथेरपीच्या इंटर्न विद्यार्थ्यांना विद्यावेतन लागू करणे या मागण्या विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांशी संबंधित आहेत. शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन केवळ आश्वासने न देता ठोस निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाकडून सकारात्मक व कालबद्ध कार्यवाही होईपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातत्याने पाठपुरावा करेल.”

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने