राजेगाव येथील कै. शुभोदिनी शाहूराज पाटील यांचे मरणोत्तर देहदान
पाटील व बागल परिवाराचा सामाजिक बांधिलकी जपणारा प्रेरणादायी निर्णय; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे पार्थिव सुपूर्द
धाराशिव :राजेगाव (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथील रहिवासी कै. शुभोदिनी शाहूराज पाटील (वय ६७) यांचे मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री दुःखद निधन झाले. मृत्यूनंतरही आपला देह समाजाच्या व वैद्यकीय शिक्षणाच्या कामी यावा, या त्यांच्या इच्छेनुसार आणि संकल्पनेनुसार पाटील व बागल परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत मरणोत्तर देहदान करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.
त्यांच्या पार्थिवाचे बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथील शरीररचनाशास्त्र विभागाकडे विधिवत देहदान करण्यात आले. या देहदानाचा उपयोग प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. व एम.डी. (अनाटॉमी) विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी होणार आहे. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चव्हाण तसेच शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. पांढरे मॅडम यांनी समस्त पाटील परिवार व बागल परिवाराच्या या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना अधिकृत 'देहदान प्रमाणपत्र' प्रदान केले.
कै. शुभोदिनी शाहूराज पाटील यांच्या पश्चात मुले श्री. रणजीत शाहूराज पाटील व श्री. अभिजीत शाहूराज पाटील (रा. राजेगाव, ता. लोहारा), मुलगी सौ. सारिका नितीन बागल, जावई श्री. नितीन बागल तसेच समस्त पाटील परिवार व बागल परिवार असा मोठा आप्तपरिवार आहे. भावी डॉक्टर घडवण्यासाठी आणि वैद्यकीय संशोधनासाठी पाटील व बागल कुटुंबीयांनी उचललेल्या या समाजप्रबोधनपर पावलाचे परिसरातून व सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा