'क' वर्गवारीतील भूकंपग्रस्तांना प्रमाणपत्रासाठीची ३४,५०० रुपयांची अट शिथील करा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 'क' वर्गवारीतील भूकंपग्रस्तांना प्रमाणपत्रासाठीची ३४,५०० रुपयांची अट शिथील करा-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


धाराशिव-सन १९९३ च्या भूकंपातील 'क' वर्गवारीतील गावांमध्ये भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देण्यासाठी असलेली ३४,५०० रुपयांची मदतीची अट शिथील करून १५,००० रुपये किंवा त्यावरील सर्व घरदुरुस्ती लाभार्थ्यांना पात्र ठरवावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शिवाजीराव निवाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

३० सप्टेंबर १९९३ रोजी धाराशिव व लातूर जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर बाधित गावांचे 'अ', 'ब' आणि 'क' अशा वर्गवारीत वर्गीकरण करण्यात आले होते. लोहारा, उमरगा, तुळजापूरसह इतर तालुक्यातील बहुतांश बाधित गावांचा समावेश 'क' वर्गवारीत करण्यात आला होता.

सध्या जिल्हा पुनर्वसन कार्यालयामार्फत 'क' वर्गवारीतील कुटुंबांना शासकीय नोकरीतील २ टक्के समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देताना किमान ३४,५०० रुपये पूर्ण मदत मिळालेली असणे अनिवार्य केले जाते. या अटीमुळे जिल्ह्यातील शेकडो पात्र भूकंपबाधित कुटुंबांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

१९९३-९४ च्या काळात अनेक घरांचे मोठे नुकसान होऊनही तांत्रिक मोजमापातील त्रुटी, कागदपत्रांची अपुरता किंवा निधी वितरणातील विलंबामुळे अनेक कुटुंबांना केवळ १५,००० ते ३४,००० रुपयांदरम्यानचा पहिला किंवा दुसरा हप्ताच मिळू शकला. त्यावेळी १५,००० रुपये ही रक्कमही मोठ्या घरदुरुस्तीसाठी मंजूर झाली होती, परंतु ३४,५०० रुपयांचा आकडा पूर्ण न झाल्याने आज या कुटुंबांना प्रमाणपत्र नाकारले जात आहे.

महाराष्ट्र शासनाने २४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये भूकंपग्रस्त कुटुंबाची व्याख्या विस्तारित करून तिसऱ्या व चौथ्या पिढीतील सुशिक्षित बेरोजगार वारसांना न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ३४,५०० रुपयांच्या जाचक अटीमुळे 'क' वर्गवारीतील पात्र तरुण या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे निवाळकर यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील भूकंपबाधित कुटुंबांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन 'क' वर्गवारीतील गावांमध्ये किमान १५,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक घरनुकसान भरपाई मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्रासाठी पात्र ठरविण्याबाबत सकारात्मक अभिप्रायासह शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने