शेतजमिनीच्या वादातून मारहाण भोवली; तिन्ही आरोपी न्यायालयात दोषी

शेतजमिनीच्या वादातून मारहाण भोवली; तिन्ही आरोपी न्यायालयात दोषी
लातूर : शेतातील वादातून एका ज्येष्ठ नागरिकास मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी मुरुड पोलिसांत दाखल गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरविले आहे. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, जखमी फिर्यादीस ५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे गादवड (ता. जि. लातूर) येथील शेतशिवारात शेतीच्या कारणावरून झालेल्या वादातून नवनाथ विठ्ठल भिसे यांना मारहाण करून दुखापत करण्यात आली होती. या प्रकरणी २३ जुलै २०२० रोजी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४३/२०२० अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात अनिकेत उर्फ गणेश भारत भिसे, भारत निवृत्ती भिसे आणि महानंदा भारत भिसे (सर्व रा. गादवड, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार व्ही. टी. चौगुले यांनी करून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, लातूर येथे आरसीसी क्रमांक ८६६/२०२० अन्वये झाली. सुनावणीअंती न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे तिन्ही आरोपींना भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२३ व ३४ अन्वये दोषी ठरविले. त्यानुसार तिन्ही आरोपींना प्रत्येकी २ हजार ५०० रुपये, असा एकूण ७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच जखमी फिर्यादी नवनाथ भिसे यांना ५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता श्रीमती सूर्यवंशी यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. कोर्ट पैरवीचे काम पोलीस हवालदार इम्रान शेख यांनी पाहिले. न्यायालयीन कामकाजाचा नियमित पाठपुरावा व्हावा, यासाठी मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील अंधारे यांनी विशेष लक्ष देऊन प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेवर देखरेख ठेवली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने