भारत विश्व गुरु होण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिकविकासाला राजकीय क्षेत्राची जोड मिळणे गरजेचे-ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके


भारत विश्व गुरु होण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक

विकासाला राजकीय क्षेत्राची जोड मिळणे गरजेचे-ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके 





 

लातूर - देशाच्या सर्वांगीन विकासाचा विचार राष्ट्रपुरुषांनी मांडला. संतांचा आणि महापुरुषांचा वारसाच देशाला पुढे घेऊन जावू शकतो. आज देशाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. गेल्या 75 वर्षात देशाची झालेली प्रगती अतिशय मोलाची आहे. देशाच्या सामाजिक, सांस्कृतीक विकासाला राजकीय क्षेत्राची जोड मिळाली तर भारत विश्वगुरु होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले.

लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील श्री संत ज्ञानेश्वर घुमट येथे मंगळवार, दि. 6 सप्टेंबर रोजी ‘देशाचे सामाजिक, राजकीय आरोग्य’ या विषयावरील आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. हरी नरके बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी पुणेचे संस्थापक-विश्वस्त प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. यावेळी साहित्यीक तथा ज्येष्ठ विचारवंत प्रा. रतनलाल सोनग्रा, रामेश्वर चे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी.  जमादार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्व्लन करुन परिसंवादाची सुरुवात करण्यात आली.

परिसंवादात आपले विचार व्यक्त करताना प्रा. हरी नरके म्हणाले की, जिथे स्वातंत्र्य, समता असते तिथेच न्याय असतो. अशा परिस्थितीत देशाचे सामाजिक आणि राजकीय आरोग्य म्हत्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती अतिशय मोलाची असून गुणवत्ता, दर्जा वाढला पण यात किती यश मिळाले याचा विचार व्हायला हवा. एका बाजूला प्रचंड विश्व, प्रगती, झगमगाट आहे तर दुसऱ्या बाजुला कचरा वेचून जगणाऱ्या माणसांची भिषण परिस्थिती  आहे. कचरा करणाऱ्यांनी कधीतरी याचा विचार केला का? असा प्रश्न उपस्थित करुन अत्याधुनिक तंत्रज्ञान हाती असतानाही माणसाला आजही गटारात उतरून काम करावे लागते. आजही देशात 10 लाख भिखारी आहेत, 30 टक्के लोकांना निवारा नाही तर 40 कोटी लोक दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहेत. या परिस्थितीचा विचार करता देशात सामाजिक आणि राजकीय आरोग्याची जोड होणे गरजेचे आहे. सध्या देशात राजकीय वातावरण दूषीत झाले असून शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार अनुकरणात आणल्यास लोकशाही मजबुत होऊन देश विश्वगुरु होण्यास मदत होईल.

शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्याची संकल्पना महात्मा गांधींनी मांडली तर शेती हा प्राचीन उद्योग आहे, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होईल असा इशारा शंभर वर्षापुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीतून दिला होता असे सांगून प्रा. हरी नरके म्हणाले की, आजही शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला नाही. एका खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा प्रतिकुल पिरिस्थितीत उच्च शिक्षण घेवून समाजातील तरुणांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी पाच विद्यापिठे, 70 पेक्षा अधिक शिक्षण संस्था उभा करणारे डॉ. विश्वनाथ कराड सर यांचे कार्य खुप मोलाचे आहे. त्यांनी रामेश्वर या आपल्या गावी शाळा, दवाखाणा, तालीम, वाचनालय, राममंदिर, बुध्दविहार, मस्जिद, रामरहिम सेतू आदी वास्तू उभारुन संकल्पचित्र, मानवतातिर्थ निर्माण करण्याचे मोठे कार्य केले आहे. अशा कार्याची इतर गावांनी प्रेरणा घेणे गरजेचे आहे.


यावेळी बोलताना प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले की, आपल्या देशात लोकशाही असल्याने बहुमतांनी निर्णय होतात मात्र इरत देशात तसे होत नाही त्यामुळे त्या देशात आज बह्यावह परिस्थिती आहे. देशाच्या विकासासाठी राजकीय क्षेत्र महत्त्वाचे आहे. देशात वेगवेगळे गट, समुह आहेत. प्रत्येकात असलेल्या गरीबी आणि दारिद्रयाविरुध्द लढण्याची गरज आहे. विकासापासून कोसोदूर असलेला आदिवाशी समाज आज विकासाच्या प्रवाहात येत आहे. गेल्या 75 वर्षात देशात काहीही घडले नाही हे म्हणणे चुकीचे आहे. आज आदीवाशी महिला देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्चपदी विराजमान झाल्या. देशातील स्वातंत्र्य कुठं आणि कसं आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकले पाहिजे असे सांगून, डॉ. विश्वनाथ कराड सर यांनी केलेले कार्य गौरवास्पद असल्याचे सोनग्रा यांनी सांगीतले.

यावेळी बोलताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, जगातील सर्वच धर्मग्रंथ हे मानवतेचा संदेश देणारे आहेत. या धर्म ग्रंथांमधील सार समजून घेवून त्यांना जीवनग्रंथ बनवणे गरजेचे आहे. भारतीय संस्कृतीकडे जगातील आदर्श संस्कृती म्हणून पहिले जाते. देशासाठी अनेक संत, महात्म्यांनी मोठे योगदान दिलेले असून तथागत गौतम बुध्द, संत ज्ञानेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी कमी वयात आपल्या कार्यातून समाजाला दिशा दिली. आत्मा आणि मन म्हणजे आध्यात्मशास्त्र होय. टाळ, मृदंग आणि विना या माध्यमातून भजन, किर्तन करणे म्हणजे ही सुध्दा आध्यात्माची साधना आहे. ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांच्या साधनेतूनच जगात शांतता नांदेल असे डॉ. कराड म्हणाले.

प्रारंभी उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांनी प्रस्ताविक केले. तर शेवटी डॉ. एन. पी. जमादार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी जाधव व डॉ. अमोल डोईफोडे यांनी केले. या कार्यक्रमास एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, संचालिका डॉ. सरिता मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. एच. मिश्रा, प्राचार्य सरवनन सेना यांच्यासह एमआयटी शिक्षण संकुलातील प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने