मूग, उडीद पेरणीचा कालावधी संपला!

 मूग, उडीद पेरणीचा कालावधी संपला!

लातूर : प्रतिनिधी
शेतक-यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतीच्या मशागतीचे सर्व कामे पूर्ण केली आहेत. जिल्हयात यावर्षी ६ लाख १ हजार ५०० हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या होणार आहेत. मात्र अजूनही जिल्हयात पावसाचे आगमन न झाल्याने मूग व उडीद या पिकाच्या पेरणीचा कालावधी जवळपास संपला असून शेतक-यांची मदार आता सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, कापूस या पिकावर असणार आहे.शेतकरी अधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत खरीपाच्या पेरणीपुर्व शेतातील मशागतीची ट्रॅक्टरवर पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. तर ज्या शेतक-यांकडे बैल बारदाना आहे. त्यांनी सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतात नांगरनी, मोगडा, कुळव चालवत मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. पावसाळयाचा कालावधी सुरू होऊन १५ ते २० दिवस झाले तरी अद्याप पावसाचे आगमन झाले नाही. दि. २० ते २२ जून पर्यंत मूग व उडीद पिकाचा पेरा करण्याचा कालावधी होता. उशीरा पेरणी झालेल्या मूग व उडीद पिकास म्हणावी तेवढी उत्पादकता मिळत नाही. मात्र शेतक-यांना दि. १५ जुलै पर्यंत सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, तीळ आदी पिकांचा पेरा करता येणार आहे. शेतक-यांना चाढयावर मूठ ठेवण्यासाठी किती दिवस वाट पाहवी लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर्षी कृषि विभागाला जिल्हयात ६ लाख ६ लाख १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पे-याची अपेक्षा आहे. यात सोयाबीनचा पेरा ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर होणार आहे. ७० हजार हेक्टर क्षेत्रावर तुर, १० हजार हेक्टर क्षेत्रावर मुग, ८ हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद, १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, ४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका, ६ हजार हेक्टर क्षेत्रावर भुईमुंग, ६०० हेक्टर क्षेत्रावर तीळ, १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर बाजरी, ५ हजार हेक्टर क्षेत्रावर साळ, १ हजार हेक्टर क्षेत्रावर सुर्यफूल, २ हजार हेक्टर क्षेत्रावर लहान कारळे आदी पिकांचा पेरा होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाचे आगमन लांबल्याने मूग व उडीदाचा पेरा संकटात आला आहे. त्याचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीनच्या पे-यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने