छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त अक्का फाऊडेशनच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन

   छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त अक्का फाऊडेशनच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन

लातूर /प्रतिनिधी ः- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा राज्याभिषेक दिनानिमित्त व माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्का फाऊडेशनच्या वतीने शिवधारा या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निबंध स्पर्धा खुल्या गटासाठी असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत स्पर्धेच्या विविध विषयांकरीता निबंध ऑनलाईन पद्धतीने पिडीएफ स्वरुपात पाठविण्याचे आवाहन अक्का फाऊडेशनचे संस्थापक तथा भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केलेले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषक रोख स्वरूपात देण्यात येणार असून सदर निबंध दि. 6 जून ते 16 जून 2023 या कालावधीत अपलोड करता येणार आहेत.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मोठा असून हा इतिहास सर्वांसाठीच आदर्शदायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या जीवन कार्यात केलेले विविध कार्य अविस्मरणीय असून आजही त्याबाबत संपूर्ण जगभरात विविध माध्यमातून चर्चा होते. छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास व त्यांचे कार्य भावी पिढीपर्यंत पोहचावे व त्याचा आदर्श त्यांनी घ्यावा याकरीता अक्का फाऊडेशने पुढाकार घेतला आहे. अक्का फाऊडेशने यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्याचबरोबर यानिमित्त केलेल्या विविध उपक्रमाची केवळ देशातच नव्हे तर जागतीक पातळीवरही नोंद घेण्यात आलेली आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी अक्का फाऊडेशनचे संस्थापक तथा भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा दि. 6 जून रोजी 350 वा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने  राज्यभरातच नव्हे तर देशपातळीवर विविध उपक्रम व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत.
350 वा शिवराज्याभिषेक दिन, माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस यानिमित्ताने व अक्का फाऊडेशनच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत अक्का फाऊडेशनच्या वतीने शिवधारा या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निबंध स्पर्धा खुल्या गटासाठी असून या स्पर्धेसाठी शिवराज्याभिषक दिनाचे महत्व, शिवराज्याभिषेकःएक युगप्रवर्तक सोहळा, शिवराज्याभिषेक दिन आणि आजचा भारतीय समाज, छत्रपती शिवरायांचे प्रशासन-राज्य व्यवस्था, छत्रपती शिवरायांच्या मुल्यांची आजच्या काळातील गरज, छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील भारत व आपले योगदान हे विषय देण्यात आलेले आहेत. सदर विषयावर मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही विषयात स्पर्धकांना निबंध पाठविता येणार आहेत. सदर निबंध पुढील लिंकवर https://bit.ly/shivadhara https://arvindpatilnilangekar.com/shivdhara/ https://akkafoundation.in/shivdhara/ दि. 6 जून ते 16 जून 2023 या कालावधीत अपलोड करता येणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम विजेत्याला रू. 21 हजार 1 , द्वितीय विजेत्याला रू  11 हजार 1 तर तृतीय विजेत्याला 5 हजार 1 या रोख रक्कम देऊन स्मृतीचिन्हानेने सन्मानित केले जाणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास आणि त्यांनी केलेले विविध कार्य भावी पिढीपर्यंत पोहचविणे हा उद्देश असून यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यास उजाळाही देता येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन फाऊडेशनचे संस्थापक तथा भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने