पानगावच्‍या पुरातन विठ्ठल रूक्‍मीणी मंदिरास राज्‍य संरक्षित स्‍मारकाचा दर्जा मिळवून देणार- आ. रमेशअप्‍पा कराड यांची ग्‍वाही

पानगावच्‍या पुरातन विठ्ठल रूक्‍मीणी मंदिरास राज्‍य संरक्षित स्‍मारकाचा दर्जा मिळवून देणार- आ. रमेशअप्‍पा कराड यांची ग्‍वाही
            लातूर - अंदाजे १२-१३ व्‍या शतकातील हेमाडपंथी स्‍थापत्‍य शैलीतील पानगाव येथील श्री. विठ्ठल रूक्‍मीणी मंदिराचे जतन व्‍हावे, या मंदिराचा सर्वांगीन विकास व्‍हावा याकरीता निश्चितपणे राज्‍यातील महायुती शासनाच्‍या माध्‍यमातून राज्‍य संरक्षित स्‍मारकाचा दर्जा मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याची ग्‍वाही भाजपाचे नेते आ. रमेशअप्‍पा कराड यांनी पानगाव येथील मंदिर ट्रस्‍ट पदाधिकारी व सर्वपक्षीय शिष्‍टमंडळास दिली.
          पानगाव येथील श्री. विठ्ठल रूक्‍मीणी मंदिरास राज्‍य संरक्षित स्‍मारकाचा दर्जा मिळावा यासाठी भाजपाचे नेते आ. रमेशअप्‍पा कराड यांची शुक्रवार दि. १५ सप्‍टेंबर रोजी लातूर येथे मंदिर ट्रस्‍ट पदाधिकारी व सर्वपक्षीय शिष्‍टमंडळाने भेट घेवून एका निवेदनाद्वारे मागणी केली असता त्‍यांनी ग्‍वाही दिली. यावेळी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, माजी सरपंच प्रदिप कुलकर्णी, माजी सरपंच सुकेश भंडारे, रेणापूर कृऊबाचे माजी सभापती चंद्रचूड चव्‍हाण, माजी जिप सदस्‍य ईश्‍वर गुडे, चंद्रकांत आरडले, गोविंद नरहारे, उत्‍तरेश्‍वर हालकुडे, ज्ञानोबा फुले, मारूती गालफाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
          पानगाव येथील श्री. विठ्ठल रूक्‍मीणी मंदिराच्‍या वास्‍तू शैलीवरून हे मंदिर उत्‍तर चालुक्‍य कालीन १२-१३ व्‍या शतकातील असावे. या मंदिरावर होयसळ, चालुक्‍य आणि काकतीय यांच्‍या कालखंडातील स्‍थापत्‍य कलेचा प्रभाव दिसून येतो. मंदिरतील सभामंडप आणि गर्भगृह हेमाडपंथी स्‍थापत्‍य शैलीचे असल्‍याचे दिसून येते. सभामंडपात कलात्‍मक स्‍तंभाची रचना असून मंदिराच्‍या बाह्य भागात भौमितीक नक्षीकाम तसेच देवदेवतांची शिल्‍पे कोरलेली दिसून येतात असे हे पुरातन श्री. विठ्ठल रूक्‍मीणी मंदिराचे जतन झाले पाहीजे. मंदिराचा सर्वांगिन विकास झाला पाहीजे असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, आपण स्‍वतः जातीने लक्ष घालून या मंदिरास राज्‍य संरक्षित स्‍मारकाचा दर्जा मिळवून देण्‍यासाठी संबंधीत विभागाच्‍या मंत्री महोदयाशी चर्चा करून स्‍वतंत्रपणे बैठकीचे नियोजन केले जाईल असे बोलून दाखविले.
         यावेळी आ. रमेशअप्‍पा कराड यांनी पानगाव गावातील विविध विकास कामाबाबत शिष्‍टमंडळासमवेत चर्चा केली असता विठ्ठल रूक्‍मीणी मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची सोय व्‍हावी याकरीता शौचालय बांधकामासाठी तात्‍काळ निधी उपलब्‍ध करून दिला जाईल, त्‍याचबरोबर या मंदिराला पर्यटन विकासाचा ब दर्जा मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न केला जाईल असे बोलून दाखविले.
        पानगाव येथील मातंग समाज स्‍मशानभूमीला संरक्षण भिंत बांधकामासाठी आणि अंतर्गत सुविधेसाठी त्‍याचबरोबर भवानी मंदिर परिसरात सभागृह बांधकामासाठी शासनाच्‍या वतीने निधी उपलब्‍ध करून देवू अशी ग्‍वाही देवून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, रूग्‍णांना सर्व प्रकारच्‍या सुविधा मिळाव्‍यात यासाठी पानगाव येथे ग्रामीण रूग्‍णालय व्‍हावे याकरीता प्रयत्‍न करणार असून पानगाव येथील रेल्‍वे स्‍थानकावरून धावणाऱ्या सर्व रेल्‍वेंना थांबा मिळावा यासाठी रेल्‍वे मंत्र्याशी चर्चा करून थांबा मिळवून घेवू. अनेक दिवसांपासून रखडलेल्‍या खरोळा पाटी ते पानगाव रस्‍त्‍याच्‍या कामाला गती मिळावी यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा झाली असून लवकरच प्रत्‍यक्ष कामाला सुरूवात होणार असल्‍याचे सांगितले.आ. रमेशअप्‍पा कराड यांना भेटलेल्‍या शिष्‍टमंडळात जयराम कस्‍तूरे, बब्रूवान संपत्‍ते, सुर्यकांत गालफाडे, सिध्‍देश्‍वर व्‍यवहारे, नागनाथ फुले, बाबुराव कस्‍तूरे, योगिराज सिरसाट, सुरेंद्र हरीदास, दत्‍तात्रय भंडारे, नाथराव गिते, गणेश तूरूप, गोविंद दुड्डे यांच्‍यासह अनेकजण होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने