जगाच्या ट्रेड पेक्षा मनाचा ट्रेंड ओळखून करिअर निवडावे.- डॉ. संदीपान जगदाळे

जगाच्या ट्रेड पेक्षा मनाचा ट्रेंड ओळखून करिअर निवडावे.- डॉ. संदीपान जगदाळे 
श्री विजयकुमार स्वामी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

लातूर /प्रतिनिधी- आपण ग्रामीण भागातले आहोत असा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने करिअरची निवड करावी. करियर निवडत असताना मिळालेले गुण, मित्राने कोणती शाखा निवडली, आई-वडिलांच्या अपेक्षांची ओझे आणि जगाच्या ट्रेड पेक्षा मनाचा ट्रेंड ओळखावा व आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घ्यावा असे प्रतिपादन समुपदेशक डॉ संदिपान जगदाळे यांनी केले. ते श्री अखंडेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित श्री विजयकुमार स्वामी ग्रामविकास प्रतिष्ठान तांबाळा तालुका निलंगा यांच्या वतीने आयोजित ‘शिक्षणाच्या वाटा भविष्याच्या दिशा‘ या कार्यक्रमात बोलत होते. 

     दोन तासात चाललेले या कार्यक्रमात डॉ. जगदाळे पुढे म्हणाले की, करिअर म्हणजे केवळ पैसा प्राप्त करणे असे नव्हे तर निवडलेल्या करिअरला आपण काय योगदान देणार आहोत हे महत्त्वाचे आहे. करिअर निवडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा परंतु एकदा करिअर निश्चित झाल्यानंतर त्यातून माघार न घेता आत्मविश्वासाने व परिश्रमाने त्या करिअरमध्ये समर्पित भावनेने कार्य करावे. आपले वर्धमान कर्तुत्व समाज व राष्ट्राच्या चरणी समर्पित व्हावे असे प्रतिपादित केले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक व मानव संसाधन, पुणे येथील संचालक सूर्यकांत मुळे यांनी केले. निलंगा तालुक्यातील भूमिपुत्र या नात्याने मला माझ्या पंचक्रोशीतील विद्यार्थी,पालक व शेतकऱ्यांची सेवा करायची आहे, याही पुढे अनेक सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून ग्रामोद्धार करण्याचे माझे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
     
     करिअर मार्गदर्शन कार्यक्रमासाठी विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व सीमावर्ती भागातील चार शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या २४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार स्वामी हे उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी आशीर्वचन दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तांबाळा येथील श्री षण्मुखेश्वर  विद्यालयाचे मुख्याध्यापक उडबळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहू गुरुजी, वलांडे गुरुजी, संस्थेचे अध्यक्ष श्री इंडे  गुरुजी, उपाध्यक्ष श्री दरेकर सर, सचिव श्री पृथ्वीराज मुळे यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने