मराठवाड्यात नेतृत्वाची पोकळी; युवकांनी आता व्यवस्थेला जाब विचारण्याची वेळ
मराठवाड्याने महाराष्ट्राला मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा सभापती अशा सर्वोच्च पदांवर काम करणारे अनेक दिग्गज नेते दिले. शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण हे चार मुख्यमंत्री मराठवाड्याने दिले. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे प्रभावी केंद्रीय मंत्रीही याच मातीतून पुढे आले. मात्र, आज त्याच मराठवाड्यात नेतृत्वाची धार बोथट झाल्याचे चित्र दिसत असून, या नेतृत्वाच्या पोकळीचा थेट परिणाम या प्रदेशाच्या विकासावर होत आहे.
पूर्वी मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी राज्याच्या सत्ताकेंद्रात ठामपणे आवाज उठवणारे नेतृत्व होते. आज मात्र विविध मतदारसंघांपुरते मर्यादित राजकारण होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. मराठवाड्याच्या सामूहिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन सरकारला जाब विचारणारे नेतृत्व तुलनेने कमी झाले आहे.
सत्तेच्या राजकारणात काही नेते आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सत्ताधारी व्यवस्थेच्या जवळ जाण्याचा मार्ग स्वीकारला, अशी टीका केली जाते. परिणामी, मराठवाड्याच्या व्यापक प्रश्नांपेक्षा मतदारसंघातील राजकारणाला अधिक महत्त्व मिळत असल्याचे चित्र आहे.
याच काळात या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद असलेल्या तरुणांना जात, पात, आरक्षण आणि विविध सामाजिक संघर्षांमध्ये गुंतवून ठेवले जात आहे. समाजातील अस्वस्थता आणि लढण्याची ऊर्जा व्यापक विकासाच्या प्रश्नांकडे वळण्याऐवजी विविध आंदोलनांमध्ये खर्च होत आहे. आव्हाने स्वीकारण्याची क्षमता असलेले काही नेतेही सत्तेच्या राजकारणात अडकून पडल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
पाणी आणि रोजगार हेच मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न
आज मराठवाड्यासमोर दुष्काळ, पाणीटंचाई, वाढते तापमान, शेतीचे प्रश्न, वृक्षतोड, बेरोजगारी आणि स्थलांतर यांसारखी गंभीर आव्हाने उभी आहेत. आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे होत राहतील. सत्ताधारी नेते आणि लोकप्रतिनिधी पाहणी करतील, आश्वासने देतील, जनतेला धीर देतील आणि पुढे निघून जातील. मात्र, या समस्यांशी प्रत्यक्ष झुंजण्याची जबाबदारी शेवटी इथल्या जनतेलाच घ्यावी लागणार आहे.
केवळ घोषणांचा सुकाळ आणि आश्वासनांची वल्गना करून मराठवाड्याचा विकास होणार नाही. पाण्याच्या प्रश्नावर दीर्घकालीन आणि प्रत्यक्ष काम, मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड, जलसंधारण आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देणे, ही काळाची गरज आहे.
जोपर्यंत या मूलभूत प्रश्नांवर ठोस कृती होत नाही, तोपर्यंत दुष्काळाचे संकट, वाढते तापमान, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे संकट, बेरोजगारी आणि कौटुंबिक तणाव यांसारख्या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
युवकांनी पुढे येण्याची गरज
मराठवाड्याच्या भविष्यासाठी आता युवकांनी पुढे येणे आवश्यक आहे. पक्षभेद, मतभेद, जात-पात, धर्म-पंथ या भेदांपलीकडे जाऊन विकासाच्या प्रश्नांवर एकत्र येण्याची गरज आहे. सरकारी योजनांमध्ये आणि विकासकामांमध्ये लोकसहभाग वाढवून पाणी, जलसंधारण आणि वृक्षलागवडीसारख्या विषयांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याची आवश्यकता आहे.
जर शासनव्यवस्था या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसेल, तर लोकशाही मार्गाने व्यापक जनचळवळ उभी करून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडावे लागेल.
मराठवाड्यात उद्योग आणि रोजगार का नाही?
आज मोठे उद्योग विविध राज्यांमध्ये जात असल्याच्या चर्चा होत आहेत. अशा परिस्थितीत मराठवाड्यात मोठे उद्योग आणून इथल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मराठवाड्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी मोठे उद्योग या प्रदेशात का आणले जाऊ शकत नाहीत? हा प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधींनी सरकारला ठामपणे विचारण्याची वेळ आली आहे.
लातूरमध्ये स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घ्यावी
मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या गंभीर पार्श्वभूमीवर लातूरसारख्या ठिकाणी स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक आयोजित करणे आवश्यक आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यासाठी सिंचनासंदर्भात ज्या घोषणा व निधीच्या तरतुदी करण्यात आल्या, त्यापैकी प्रत्यक्ष किती निधी उपलब्ध झाला, किती खर्च झाला आणि किती कामे पूर्ण झाली, याचा आढावा या बैठकीत घेतला पाहिजे.
त्याचबरोबर सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर तातडीच्या उपाययोजना सुरू करून दीर्घकालीन जलव्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे.
आता केवळ पोकळ घोषणा ऐकण्याची किंवा आश्वासनांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरलेले पाहण्याची मानसिकता जनतेची राहिलेली नाही. मराठवाड्याला आता घोषणांपेक्षा कृती, आश्वासनांपेक्षा परिणाम आणि राजकारणापेक्षा विकास हवा आहे.
मराठवाड्याच्या भविष्यासाठी आजचा युवक जागा झाला नाही, तर उद्याची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे आता वेळ आली आहे—व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची, जाब मागण्याची आणि मराठवाड्याच्या विकासासाठी स्वतःचा सहभाग नोंदवण्याची.
— शिवकुमार नागराळे
जिल्हाध्यक्ष, मनसे, लातूर
मो. ९४२१३५५१३६
टिप्पणी पोस्ट करा